Type Here to Get Search Results !

खेलो इंडिया २०२५ : जलतरणात महाराष्ट्राची पदक सप्तमी! आदिती हेगडेचे सुवर्ण, सात जलतरणपटूंनी दाखवली कमाल

 


खेलो इंडिया २०२५ : जलतरणात महाराष्ट्राची पदक सप्तमी!
आदिती हेगडेचे सुवर्ण, सात जलतरणपटूंनी दाखवली कमाल

 

गया (बिहार): ७व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या जलतरण स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी कमालीचे प्रदर्शन करत तब्बल ७ पदकांची कमाई केली. मुंबईच्या आदिती हेगडे हिने १ सुवर्ण आणि १ कांस्य पटकावत महाराष्ट्राच्या खात्यात पहिले सुवर्णपदक नोंदवले. तिच्या साथीने समाईरा मल्होत्रा, झारा बक्षी, शुभम जोशी, वेदांत तांदळे आणि ऋजुता राजाज्ञा यांनी देखील पदकांची लयलूट करत राज्याचा झेंडा अभिमानाने फडकावला.

 


आदिती हेगडे – सुवर्ण विजेती!

मुलींच्या २०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात आदितीने शतांश सेकंदाच्या फरकाने दिल्लीच्या तितिक्षा रावतला मागे टाकत २:०९.५१ वेळेत स्पर्धा जिंकली. ही शर्यत अक्षरशः श्वास रोखून पाहावी अशी झाली होती. याचबरोबर आदितीने ८०० मी. फ्रीस्टाईल मध्ये कांस्यपदक मिळवत खेळो इंडिया स्पर्धेतील आपले ६ वे पदक जिंकले. आदिती सध्या मुंबईतील खेलो इंडिया अ‍ॅकॅडमीत सराव करते.

 


डबल धमाका – समाईरा व झारा!

१०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात मुंबईच्या समाईरा मल्होत्राने रौप्य, तर झारा बक्षीने कांस्यपदक पटकावले. सुवर्ण कर्नाटकच्या मानवी वर्माने जिंकले.

 


शुभम, वेदांत, ऋजुता चमकले!

ठाण्याच्या शुभम जोशीने १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात कांस्यपदक पटकावले, तर पुण्याच्या वेदांत तांदळेने ५० मी. बटरफ्लाय मध्ये पदार्पणातच कांस्य मिळवले. वेदांत व ऋजुता राजाज्ञा हे डेक्कन जिमखाना (पुणे) येथे सराव करतात. ऋजुताने सलग दुसऱ्या स्पर्धेत पदक जिंकत आपली सातत्यपूर्ण चमक दाखवली.


एकूण पदके – ७

🥇 सुवर्ण – १ (आदिती)

🥈 रौप्य – १ (समाईरा)

🥉 कांस्य – ५ (आदिती, झारा, शुभम, वेदांत, ऋजुता)

जलतरणात महाराष्ट्राची ही ‘सप्तमी’ म्हणजे पुढील विजयांची नांदीच म्हणता येईल!


Post a Comment

0 Comments