Type Here to Get Search Results !

सिद्धेशचा सुवर्ण झळाळीदार ‘स्प्रिंट’, आकांक्षाचा दुहेरी धमाका! महाराष्ट्राचे सायकलपटू खेलो इंडियामध्ये चमकले


 

सिद्धेशचा सुवर्ण झळाळीदार ‘स्प्रिंट’, आकांक्षाचा दुहेरी धमाका!
महाराष्ट्राचे सायकलपटू खेलो इंडियामध्ये चमकले

 

नवी दिल्ली : ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी दमदार कामगिरी करत मैदान गाजवले. पुण्याच्या सिद्धेश घोरपडे याने मुलांच्या स्क्रॅचरेस प्रकारात सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्रासाठी विजयश्री खेचून आणली. तर जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे हिने रौप्य व कांस्यपदकांची दुहेरी कमाई करत महिला गटात महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकावला.

 

यमुना वेलोड्रम, इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या १० किलोमीटर स्क्रॅचरेस प्रकारात सिद्धेशने चुरशीच्या शर्यतीत १३ मिनिटे २६.५८४ सेकंद वेळेत फिनिशिंग लाईन पार करत बाजी मारली. राजस्थानच्या महावीर सारनने १३.२६.६०१ सेकंद वेळेसह रौप्य, तर सिताराम बेनिवलेने १३.२७.९३३ वेळेसह कांस्य मिळवले. सिद्धेश क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू असून, प्रशिक्षक दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे सुवर्णपदक जिंकले.

 

दुसरीकडे, महिलांच्या गटात आकांक्षा म्हेत्रेने ७.५ किलोमीटर स्क्रॅचरेस मध्ये अटीतटीच्या लढतीनंतर ११ मिनिटे ५१.६४९ सेकंद वेळेसह कांस्यपदक मिळवले. केवळ एका सेकंदाच्या फरकाने ती सुवर्णापासून हुकली. राजस्थानच्या हर्षिता जाखरने ११.५०.९७३ वेळेसह सुवर्ण, तर बिहारच्या सुहानी कुमारीने ११.५१.५५८ वेळेसह रौप्य जिंकले.

 

त्याचबरोबर आकांक्षाने मेडल टाईम ट्रायल (केटीटी) प्रकारातही चमकदार कामगिरी करत ३८.७४२ सेकंद वेळेत रौप्यपदकावर झेप घेतली. हर्षिता जाखरने पुन्हा एकदा आघाडी घेत ३८.६३१ वेळेसह सुवर्ण पटकावले, तर तमिळनाडूच्या एस. थाबिथाने ३९.४५४ वेळेसह कांस्य मिळवले.

 

पुण्यात दर्शन बारगुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी आकांक्षा म्हेत्रे, सायकलिंगमध्ये दोन पदकांची कमाई करणारी महाराष्ट्राची एकमेव महिला सायकलपटू ठरली आहे.

 

या चमकदार यशामुळे महाराष्ट्राच्या सायकलिंग मोहिमेला नवे बळ मिळाले असून, सिद्धेश व आकांक्षाने आपल्या खेळातून राज्याचा गौरव उंचावला आहे.

Post a Comment

0 Comments