स्वस्तिक, शूर जवान आणि संघर्षची विजेते
४३व्या जिल्हा अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीत स्वस्तिकचे सलग
चौथे जेतेपद; शूर जवान आणि संघर्ष मंडळाचीही दमदार कामगिरी!!
मुंबई : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित ४३व्या
जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक मंडळ,
शूर जवान आणि संघर्ष मंडळ यांनी अप्रतिम कामगिरी करत
विजेतेपदाची घोडदौड कायम ठेवली.
गजानन मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्टस् अकादमी यांच्या
संयुक्त विद्यमाने, आमदार पराग आळवणी व आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले येथील
प्लेग्राउंडवर ही स्पर्धा रंगतदार वातावरणात सुरू आहे.
पूर्व विभाग प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात
स्वस्तिक मंडळाने घाटकोपरच्या ओवळी मंडळावर मात करत सलग चौथ्यांदा विजेतेपद
पटकावले. अक्षय बर्डे, ऋतिक कांबळे यांच्या चढाई-पकडीला आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शिंदे यांच्या
मार्गदर्शनाची साथ लाभली. निलेशने प्रत्यक्ष मैदानात उतरून संघाची भक्कम कामगिरी
घडवली. ओवळीच्या आर्यवर्धन नवाले आणि अलंकार पाटील यांनी उत्तरार्धात केलेल्या
झुंजार खेळामुळे सामना रंगतदार झाला.
पश्चिम विभाग महिलांच्या अंतिम लढतीत गोरेगावच्या संघर्ष
मंडळाने वांद्रे (पूर्व) येथील महात्मा गांधी स्पोर्टस् अकादमीचा पराभव करत
विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोमल देवकर आणि प्रणाली नागदेवते यांच्या संयमी
तसेच रणनीतीपूर्ण खेळाचे हे फळ आहे. स्नेहल चिंदरकर आणि करीना कामतेकर यांनी
उत्कृष्ट खेळ करूनही महात्मा गांधी संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
पूर्व विभाग द्वितीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात
मुलुंडच्या शूर जवान कबड्डी संघाने विक्रोळीच्या टागोर नगर मित्र मंडळावर सहज विजय
मिळवत विजेतेपद पटकावले. कुणाल पाटील व निखिल चव्हाण यांच्या धडाडीच्या खेळाचा यात
मोठा वाटा होता. टागोर नगरच्या हर्ष शिगवणनेही प्रभावी खेळ करून सर्वांचे लक्ष
वेधले.
व्यासपीठावरील फोटो : विजेता स्वस्तिक मंडळ
मैदानातील फोटो : संघर्ष मंडळ

.jpeg)
Post a Comment
0 Comments