Type Here to Get Search Results !

भारतीय कसोटी संघाचा ‘सारा मामला’ गंभीर


भारतीय कसोटी संघाचा ‘सारा मामला’ गंभीर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाजिरवाणा व्हाईटवॉश ;

संघ व्यवस्थापनाचे डावपेच फसले, फलंदाजीतली दारुण पडझड,

निवड समिती आणि प्रशिक्षकांवर प्रश्नचिन्ह - सुहास जोशी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारत भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील स्वतःची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. एकेकाळी घरच्या मैदानावर ‘दादा’ मानला जाणारा भारतीय कसोटी संघ, आता चिंताजनक परिस्थितीतून जात असल्याचे वास्तव या मालिकेने निर्विवादपणे दाखवून दिले. गेल्या वर्षी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारतात भारताला व्हाईटवॉश देऊन धक्का दिला होता आणि आता तब्बल २५ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा तीच लाज भारतीय संघाच्या माथी मारली आहे. अशा प्रकारे भारताला भारतात दोन वेळा व्हाईटवॉश देणारा दक्षिण आफ्रिका हा जगातील पहिला संघ ठरला आहे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे.

 

खेळपट्टीचा नूर पाहता भारताची अवस्था अगदी शिकारी खुद शिकार हो गया” अशीच झाली. पहिली कसोटी अवघ्या अडीच दिवसात संपली आणि विजयासाठी लागणाऱ्या केवळ १२४ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्याच्या बंगल्याप्रमाणे ९३ धावांत कोसळली. दुसऱ्या कसोटीत तर पराभवाची लाज आणखी वाढली, तब्बल ४०८ धावांनी भारताला धूळ चारण्यात आली; हा भारताचा घरच्या मैदानावरील सर्वात मोठा पराभव. खरं तर दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेसाठी शिस्तबद्ध आणि काटेकोर तयारीसह मैदानात उतरला होता. पाकिस्तान दौऱ्यातील अनुभव, आशियाई वातावरणातील सराव, जोहान्सबर्गमधील १० दिवसांचा तयारी शिबिर याचा सरळ लाभ त्यांना मिळाला.

 

२००० साली हन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने भारताला २-० असा व्हाईटवॉश दिला होता, आणि आता बावुमाच्या संघाने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती केली. ऑस्ट्रेलियासारख्या भक्कम संघाला हरवून कसोटी चॅम्पियन होणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला भारतीय संघाने हलक्यात घेण्याची चूक केली आणि त्याची शिक्षा आता भोगावी लागली.

 

भारतीय फलंदाजीत सातत्याचा आणि जबाबदारीची जाणीव असणाऱ्या खेळाडूंचा अभाव भयावह जाणवतोय. परिस्थितीनुसार खेळ, कणखर बचाव, संघासाठी लढण्याची वृत्ती या सर्व बाबी भारतीय फलंदाजांमध्ये हरवल्यासारख्या दिसतात. बेताल फटके, स्वार्थी खेळी, आणि विकेट बोनससारख्या देणगी हेच वर्तमान चित्र दिसत आहे.

 

गंभीर रणनीतीचा बोजवारा व फलंदाजांची बेफिकीरी

भारतीय संघातील मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची रणनीती, डावपेच, संघनिवड आणि फलंदाजी क्रमाबाबतचे अकार्यक्षम निर्णय आता स्पष्टपणे प्रश्नचिन्हाखाली आले आहेत. चुकीची खेळाडू निवड, सतत बदलणारी फलंदाजी क्रमवारी, फिरकीला पोषक खेळपट्टीचा हट्ट या सर्व निर्णयांनी भारताला पराभवाच्या खाईत ढकलले. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर अंतहीन प्रयोग, पहिल्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर उतरवले आणि दुसऱ्या कसोटीत त्यालाच आठव्या क्रमांकावर पाठवले ही गोंधळाची पराकाष्ठाच म्हणावी लागेल. इंग्लंड मालिकेत कुलदिप यादवला ‘पॅसेंजर’ बनवून नेल्याची मोठी टीका झाली होती. आजवर गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली १९ कसोटीत भारताने १० पराभव पत्करले आहेत; विजय मिळवलेले ७ सामनेही दुबळ्या संघांविरुद्ध. हे सातत्य आणि मानमरातब अशा दोन्ही पातळ्यांवर अपयशच म्हणावे लागेल. भारतात आता कसोटी फलंदाजीत जबाबदारी घेणारा, धीराने लढणारा आणि संघाला वाचवणारा फलंदाज दिसत नाही हे सर्वात मोठे संकट.

 

बीसीसीआयने आता कसोटी क्रिकेटसाठी धोरणात्मक बदल करणे अत्यावश्यक आहे. केवळ सुविधा आणि कोट्यवधी रुपयांवर वाढलेले खेळाडू निवांत राहिले आणि कामगिरी करण्यात अपयशी ठरले, तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे.

 


दक्षिण आफ्रिकेचा हा शानदार विजय कौतुकास्पद आहे. बावुमाच्या नेतृत्वाखाली त्यांनी कप्तानाच्या कल्पकतेचे उत्तम दर्शन घडवले १२ पैकी ११ कसोटी जिंकण्याचा विश्वविक्रम, गोलंदाजांचे प्रभावी बदल, आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी नेतृत्वशैली निर्णायक ठरली. मार्करमने ९ झेल टिपून विक्रम केला, तर हार्मरने १७ बळी घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. रबाडाच्या अनुपस्थितीतही गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली. संधीचे सोन कसे करावे याचा उत्कृष्ट नमुना दक्षिण आफ्रिकेने सादर केला.

 

आता काय?

या पराभवामुळे भारताच्या पुढील विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या आशा आता धूसर झाल्या आहेत. या पराभवातून संघ व्यवस्थापन आणि निवड समिती बोध घेणार का, हे महत्त्वाचे राहणार आहे. बीसीसीआयने आता नव्या प्रशिक्षकाची निवड करणे अत्यावश्यक ठरले आहे. क्रिकेटसाठी हा गंभीर क्षण आहे आणि जागं होण्याची हीच वेळ. गंभीर विषयीचा अति लाड आता पुरेसा झाला आहे. खेळाडूंनाही जाब विचारणे आणि कामगिरी नसल्यास बाहेरचा मार्ग दाखवणे गरजेचे आहे. युवा खेळाडूंना संधी द्यावी, हरलो तर भारताला वाईट वाटणार नाही, पण कमीतकमी प्रयत्नशीलता तरी दिसेल.

 

दक्षिण आफ्रिकेच्या या शानदार विजयाचे मन:पूर्वक कौतुक करायलाच हवे त्यांनी संधी पकडली, जे भारताला जमले नाही. आता लवकरच वनडे मालिका रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका आपली विजयी मालिका कायम ठेवते की भारत पुनरागमन करतो याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता!


Post a Comment

0 Comments