Type Here to Get Search Results !

राज्य कबड्डीचा थरार रंगात! कुमार–कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुणे ग्रामीण, जळगाव, कोल्हापूर, रायगड आणि पिंपरी-चिंचवडची विजयी आगेकूच




राज्य कबड्डीचा थरार रंगात! कुमार–कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुणे ग्रामीण, जळगाव, कोल्हापूर, रायगड आणि पिंपरी-चिंचवडची विजयी आगेकूच

 

दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल येथे सामन्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; रोमांचक सामन्यांत कौशल्य, फिटनेस आणि जिद्दीचा अद्भुत संगम

 


पिंपरी चिंचवड, (क्री.प्र.) कबड्डीच्या मैदानावर पुन्हा एकदा थरार शिगेला पोहोचला आहे! ३६ वी कुमार–कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा२०२५ मध्ये तिसऱ्या दिवसाच्या सायंकाळी सत्रात झालेले सामने प्रेक्षकांना क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत ठेवणारे ठरले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानत्वाखाली विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे आणि राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ही प्रतिष्ठेची स्पर्धा बोपखेल येथील दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत उत्साहात सुरू आहे.



कुमार गटात पुणे ग्रामीण, जळगाव, कोल्हापूर, सांगली, रायगड आणि ठाणे शहर यांनी आपल्या दमदार कामगिरीची छाप पाडत विजय खेचून आणले. तर कुमारी गटात पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, नांदेड, पुणे ग्रामीण, उस्मानाबाद आणि नाशिक शहर यांनी विजयी भरारी घेतली.

 


कुमार गटातील सामन्यांत धडाडणारी स्पर्धा

पुणे ग्रामीणने हिंगोलीचा ६७–२४ असा मोठ्या फरकाने धुव्वा उडविला. संजय केकण, उमेश नाळे यांच्या धारदार चढाया आणि सार्थक पाटील व माऊली शितोळे यांच्या जबरदस्त पकडी भेटल्या, तर हिंगोलीच्या आर्यन नवघरे व आदित्य तायडे यांनी दमदार प्रतिकार केला.

जळगावने अवघ्या एका गुणाच्या नाट्यमय फरकाने मुंबई शहर पश्चिमवर ४५–४४ अशी रोमांचक मात केली. रायगडने सिंधुदुर्गला ६३–१९ ने पराभूत करत एकतर्फी वर्चस्व राखले. कोल्हापूरने सातार्यावर ४७–२३ असा प्रभावी विजय मिळविला. इतर झालेल्या सामन्यात ठाणे शहर–लातूर (४१–३३), सांगली–सोलापूर (४८–२३), कोल्हापूर–सातारा (४७–२३).

 


कुमारी गटात पिंपरी चिंचवडची वर्चस्वशाली सुरुवात

पुणे ग्रामीणने रायगडला ३६–१८ अशा फरकाने पराभूत केले. पिंपरी चिंचवडने बीडचा ६६–११ असा भल्यामोठा पराभव करून भुईसपाट केले. अहिल्यानगरने लातूरवर ५४–१८ अशी मात केली. इतर सामन्यांत : नांदेड–परभणी (२०–१६), नाशिक शहर–जळगाव (६९–२४), उस्मानाबाद–सिंधुदुर्ग (३४–२२).


खेळाडूंचा जोश, मैदानावरची आग आणि प्रेक्षकांचा जल्लोष!

वेग, शक्ती, जिद्द, संयम आणि चातुर्य यांचा अद्वितीय संगम या मैदानावर दिसून आला. प्रत्येक चढाई, प्रत्येक पकड आणि प्रत्येक गुणाने स्टेडियम दणाणून सोडले. महाराष्ट्रातील भविष्यातील स्टार खेळाडू घडवणारे हे महायुद्ध आहे, यातूनच उद्याचे राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योद्धे निर्माण होतील, याचा विश्वास क्रीडारसिकांनी व्यक्त केला. "कबड्डी हा खेळ केवळ स्पर्धेचा नाही—तो जिद्दीचा, टीमवर्कचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मैदानावर आपल्या घामाने भविष्य लिहिणाऱ्या या युवा खेळाडूंना सलाम!"


फोटो ओळी :

कुमार गट: रायगडच्या खेळाडूंनी सिंधुदुर्गच्या खेळाडूची केलेली पकड, कोल्हापूरच्या खेळाडूंनी सातारच्या खेळाडूची केलेली पकड, मुंबई शहर पश्चिमच्या खेळाडूने जळगावच्या खेळाडूची केलेली पकड

कुमारी गट:

पुणे ग्रामीण संघाच्या खेळाडूंची पकड करताना रायगडचे खेळाडू, पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंनी बीडच्या खेळाडूची केलेली पकड


Post a Comment

0 Comments