Type Here to Get Search Results !

आंतरशालेय खो-खो स्पर्धेत गोकुळधाम, न्यू इंग्लिश, नालंदा पब्लिक आणि आर्यन एज्युकेशन शाळांचा विजयी जल्लोष


आंतरशालेय खो-खो स्पर्धेत गोकुळधाम, न्यू इंग्लिश, नालंदा पब्लिक आणि आर्यन एज्युकेशन शाळांचा विजयी जल्लोष


५७ वी ड्रीम स्पोर्ट्स एमएसएसए स्पर्धा रोमांचक लढतींनी गाजली; विविध गटांतील चौघांनी ट्रॉफीवर नाव कोरले

 

मुंबई: मुंबई शालेय क्रीडा असोसिएशन वतीने सह्याद्री विद्या प्रसारक संस्था, भांडूप येथे आयोजित १४ व १६ वर्षांखालील मुले-मुलींची ५७ वी ड्रीम स्पोर्ट्स एमएसएसए आंतरशालेय खो-खो स्पर्धा रोमांचक सामन्यांनी दणाणून गेली. या स्पर्धेत गोरेगावची गोकुळधाम हायस्कूल, गिरगावची आर्यन एज्युकेशन सोसायटी, मुलुंडची नालंदा पब्लिक स्कूल आणि वांद्रे येथील आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल यांनी विजेतेपदाचा मान पटकावला.

 

अव्वल स्थानासाठी तुफानी संघर्ष

१६ वर्षांखालील मुली – राणी लक्ष्मी ट्रॉफी

गोरेगावच्या गोकुळधाम हायस्कूलने कांदिवलीच्या ठाकूर इंटरनॅशनल स्कूलचा ६ गुणांनी पराभव करून राणी लक्ष्मी ट्रॉफी जिंकली. आर्शिन शेख व आर्या आरख यांनी शानदार खेळ करून विजयावर शिक्कामोर्तब केले. पराभूत संघातील खुशी मेहता झळकली.

 


१४ वर्षांखालील मुली

वांद्रे येथील आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूलने गोकुळधामचा ६ गुणांनी पराभव केला.
ईशानी रहाणे (४.३० मिनिटे संरक्षण), अनन्या रेडेकर (१.२० मिनिटे + २ गडी) व दुर्वा डोकरे (३ गडी) यांनी जबरदस्त कामगिरी साकारली.

 

मुलांच्या गटातील रोमांचक सामने



१६ वर्षांखालील मुले – बालमोहन शिल्ड

गिरगावच्या आर्यन एज्युकेशनने ठाकूर इंटरनॅशनल स्कूलचा २ गुणांनी पराभव करत बालमोहन शिल्ड जिंकली. नितेश जाधव याने २.३५ मिनिटे संरक्षण तर आर्यन दुसारने ३ गडी टिपून चमक दाखवली. ठाकूरच्या अरुब रेडीजचे अष्टपैलू प्रदर्शनही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.

 


१४ वर्षांखालील मुले

मुलुंडच्या नालंदा पब्लिक स्कूलने आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूलचा १ डाव, २ गुणांनी दणदणीत पराभव केला. उदित पाटील आणि तन्मय हुले यांनी शानदार खेळ करून विजय मिळवून दिला. प्रतिस्पर्धी संघातील आदित्य झगडेची झुंज एकाकी ठरली.

 

पारितोषिक वितरण समारंभ

स्पर्धेचा पारितोषिक समारंभ सचिन चव्हाण (वरिष्ठ व्यवस्थापक – M.S.C. Cruz, Europe), उमेश भायदे (खो-खो संघटक), राजाराम पवार, रविंद्र विसपुते आणि संजय घोडके यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धा संचालनात प्रशांत भुवड (स्पर्धा प्रमुख), प्रशांत पाटणकर (उपाध्यक्ष, मुंबई उपनगर खो-खो असोसिएशन) आणि डॉ. दीपक शिंदे (सचिव, एमएसएसए भारतीय खेळ) यांनी मोलाची भूमिका बजावली.

 

स्पर्धेचा अंतिम निकाल

१६ वर्षा खालील मुले – बालमोहन शिल्ड

1.    आर्यन एज्युकेशन सोसायटी, गिरगाव       2. ठाकूर इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली

3. गोकुळधाम हायस्कूल, गोरेगाव               4. आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे

 

१६ वर्षा खालील मुली – राणी लक्ष्मी ट्रॉफी

1.    गोकुळधाम हायस्कूल, गोरेगाव                2. ठाकूर इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली

3. आर्यन एज्युकेशन सोसायटी, गिरगाव        4. युनिव्हर्सल हायस्कूल, ठाणे

 

१४ वर्षा खालील मुली

1.    आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे          2. गोकुळधाम हायस्कूल, गोरेगाव

3. युनिव्हर्सल हायस्कूल, ठाणे  4.  वसुदेव सी. वाधवा आर्य विद्या मंदिर, वांद्रे पूर्व

 

१४ वर्षा खालील मुले

1.    नालंदा पब्लिक स्कूल, मुलुंड                  2. आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे

3. युनिव्हर्सल हायस्कूल, ठाणे                      4. सेंट जॉन बॉस्को हायस्कूल, बदलापूर


Post a Comment

0 Comments