Type Here to Get Search Results !

ओम साईश्वर सेवा मंडळा विरुध्द मुलींमध्ये शिवनेरी सेवा मंडळ तर मुलांमध्ये सरस्वती स्पो. क्लब (अ) अंतिम फेरीत लढणार


कुमार – मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०२५-२६

ओम साईश्वर सेवा मंडळा विरुध्द  मुलींमध्ये शिवनेरी सेवा मंडळ तर मुलांमध्ये सरस्वती स्पो. क्लब (अ) अंतिम फेरीत लढणार 

ओम साईश्वर सेवा मंडळाचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

दोन्ही गटात ओम साईश्वर सेवा मंडळाची झंझावाती कामगिरी; उपांत्य फेरीत थरारक लढती

 

मुंबई, (क्री. प्र.), मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने इन्स्पायर फाऊंडेशन आयोजित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुरस्कृत कुमार–मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेला रंगतदार स्वरूप प्राप्त झाले आहे. केशवराव दाते क्रीडांगण, आगाशे पथ, दादर (प.) येथे आज पार पडलेल्या उपांत्य फेरीच्या थरारक सामन्यांमुळे प्रेक्षकांनी रोमांच अनुभवला. मुलींचा अंतिम सामना ओम साईश्वर सेवा मंडळ वि. शिवनेरी सेवा मंडळ तर मुलांचा अंतिम सामना ओम साईश्वर सेवा मंडळ वि. सरस्वती स्पो. क्लब (अ) यांच्यात होणार आहे. विशेष म्हणजे ओम साईश्वर सेवा मंडळाचे दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत.

 


ओम साईश्वर सेवा मंडळ वि. आर्य सेना (उपांत्य फेरी)

मुलींच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने आर्य सेनावर ५-३ (मध्यंतर ५-१) असा एक डाव राखून २ गुणांनी दिमाखदार विजय साजरा केला. ओम साईश्वरच्या निर्मिती परब (६ मि. संरक्षण), यशस्वी कदम (नाबाद ३, ४.२० मि. संरक्षण व २ गुण), कादंबरी तेरवणकर (नाबाद २.१० मि. संरक्षण), काजल मोरे (२.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी सुरवातीपासूनच सामन्यात वर्चस्व ठेवत दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली. तर पराभूत आर्य सेनेच्या सायली जाधव (३.३० मि. संरक्षण) मैदानाबाहेर गेल्याने बाद झाली, आरुषी पवार (२.३० मि. संरक्षण), अन्वी काकडे (१.३०, मि. संरक्षण) यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली मात्र त्यांच्या संघाला आक्रमणात विशेष चमक न दाखवता आल्याने पराभव टळला नाही.

 

शिवनेरी सेवा मंडळ वि. सरस्वती कन्या संघ (उपांत्य फेरी)

मुलींच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने सरस्वती कन्या संघचा ८-५ (मध्यंतर ८-२) असा एक डाव राखून ३ गुणांनी पराभव केला. शिवनेरीच्या  मुस्कान शेख (३.५०, ५ मि. संरक्षण), सिद्धी शिंदे (४.४०, १.२० मि. संरक्षण व १ गुण), आरुषी गुप्ता (२.३० मि. संरक्षण व १ गुण) व त्रिशा गुप्ता (२ गुण) यांनी संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. तर पराभूत सरस्वतीच्या अपूर्वा मुळीक (२.२० मि. संरक्षण व १ गुण), जान्हवी लोंढे (१.५० मि. संरक्षण व २ गुण), रिया सिंग (१.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेली लढत अपुरी ठरल्याने संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

 

सरस्वती स्पो. क्लब (अ) वि. वैभव स्पो. क्लब (उपांत्य फेरी)

मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती स्पो. क्लब (अ) ने वैभव स्पो. क्लबवर १०-७ (मध्यंतर १०-३) असा एक डाव राखून ३ गुणांनी धुव्वा उडवला. सरस्वतीच्या रोहन कांबळे (४ मि. संरक्षण व १ गुण), साई तुळसनकर (४ मि. संरक्षण व ३ गुण), मनीष पालये (१.५० मि. संरक्षण व २ गुण), ओमकार खरंगटे (१.४० मि. संरक्षण) यांनी मोठ्या विजयाची पायाभरणी केली अंतिम फेरीत स्थान मिळवले. तर पराभूत निहाल पंडित (२.२० मि. संरक्षण), निमेश चौगुले (२ मि. संरक्षण), यश जाधव (१.५० मि. संरक्षण), हार्दिक खानविलकर (२ गुण) यांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली मात्र यशाने त्यांना पलटी दिली.

 


ओम साईश्वर सेवा मंडळ वि. विद्यार्थी क्रीडा केंद्र (अ) (उपांत्य फेरी)

मुलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने विद्यार्थी क्रीडा केंद्र (अ)चा ९-७  (मध्यंतर ४-३) असा चुरशीच्या सामन्यात २ गुणांनी पराभव करत अंतिम फेरू गाठली. ओम साईश्वरच्या अधिराज गुरव (३.४०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), निषाद ताम्हणेकर (३, २.२० मि. संरक्षण), सार्थक माडये (नाबाद २.५० मि. संरक्षण व १ गुण), सुजल शिंत्रे (नाबाद २.२० मि. संरक्षण व १ गुण), प्रशित मोरे (१.३० मि. संरक्षण व ३गुण) यांनी सुरवातीपासूनच सामन्यात वर्चस्व ठेवत अंतिम फेरीत पोहचले. तर पराभूत विद्यार्थी (अ)च्या सुबोध पाटील (३, ३.२० मि. संरक्षण), अनुश कदम (२, १.३० मि. संरक्षण व १ गुण), क्रिश गजरमल (२.४० मि. संरक्षण व १ गुण), मानव वाल्मिकी (२ मि. संरक्षण व १ गुण) यांनी दोन्ही डावात दोरदार लढत देत पुनरागमन करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला व निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

आता संपूर्ण मुंबईचे लक्ष अंतिम लढतीमध्ये कोण विजयी ठरेल याकडे क्रीडाप्रेमींचे डोळे खिळले आहेत!


Post a Comment

0 Comments