Type Here to Get Search Results !

राज्य बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा मुंबईतील परळ येथे रंगणार


राज्य बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा मुंबईतील परळ येथे रंगणार

२८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ज्ञानेश्वर महाविद्यालय, परळ- वडाळा येथे राज्यातील दिग्गज पॉवरलिफ्टर्स भिडणार; दिव्यांग, गतिमंद आणि अंध खेळाडूंचा सहभाग विशेष आकर्षण

 

मुंबई : शक्ती, शिस्त आणि आत्मविश्वासाचे दिमाखदार प्रदर्शन असे वर्णन करता येईल अशी राज्य अजिंक्यपद बेंचप्रेस चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा  २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान वडाळा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालय, रफी अहमद किडवाई मार्ग, मुंबई-३१  येथे महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित केली आहे. ही स्पर्धा भव्यदिव्य पद्धतीने रंगणार असून राज्यातील नामवंत पॉवरलिफ्टर्स आपले सामर्थ्य आजमावण्यासाठी सज्ज आहेत.

 

फक्त वजन नाही, स्वप्न उचलण्याची ताकद”

बेंचप्रेस हा खेळ शरीराचे सामर्थ्य किती आहे यापेक्षा मन किती मजबूत आहे याची परीक्षा असते. स्टीलच्या रॉडखाली दबलेला प्रत्येक खेळाडू जेव्हा पूर्ण शक्तीनिशी वजन उचलतो, त्या क्षणी केवळ लोखंडच वर उचलले जात नाही—तर उचलले जाते त्याचे ध्येय, त्याचा प्रवास आणि त्याचा विश्वास.

 

क्लासिक आणि इक्वीप्ड दोन्ही गटांत रंगणार जोरदार लढत

या स्पर्धेत क्लासिक तसेच इक्वीप्ड गटांमध्ये सामने खेळवले जाणार असून राज्यभरातून उच्च दर्जाचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे बौद्धिक अक्षम (गतिमंद), अंध आणि अपंग खेळाडू सुध्दा विशेष श्रेणीत आपले कौशल्य सादर करणार आहेत. हि स्पर्धा सर्वसमावेशक क्रीडा संस्कृतीचे उल्लेखनीय उदाहरण ठरणार आहे!

 

असोसिएशनचे सरचिटणीस आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संजय प्रतापराव सरदेसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून प्रेक्षकांनी थरारक सामन्यांचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

व्यवस्थापनाची सक्षम टीम सज्ज

या स्पर्धेच्या व्यवस्थापनाची धुरा सक्षमपणे सांभाळण्यासाठी पुढील प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे :

सूर्यकांत गद्रे – खजिनदार (९८६९७३६७११), प्रशांत सरदेसाई (९८२०३७६७११), जितेंद्र यादव (९८१९५१३५९०)

नागरिक सहाय्यक केंद्र विश्वस्त मंडळाने या स्पर्धेस सहकार्य दिले असून यामुळे स्पर्धेची भव्यता आणि व्यवस्थापन अधिक सक्षम झाले आहे.

 

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

राज्यातील सर्वोत्तम बेंचप्रेस खेळाडूंच्या जोरदार लढती पाहण्यासाठी क्रीडा रसिक आणि युवा खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सामर्थ्य आणि सहनशक्तीच्या कसोटीवर उतरणाऱ्या या खेळाडूंच्या घामाच्या थेंबांतून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचा तेजस्वी प्रकाश उजळताना नक्कीच दिसणार आहे.

 


Post a Comment

0 Comments