Type Here to Get Search Results !

साजिद मलिक ठरला नवोदित मुंबई श्रीचा विजेता नवोदितांच्या स्पर्धेला खेळाडूंचा विक्रमी आणि अभूतपूर्व सहभाग




साजिद मलिक ठरला नवोदित मुंबई श्रीचा विजेता

 

नवोदितांच्या स्पर्धेला खेळाडूंचा विक्रमी आणि अभूतपूर्व सहभाग

 

मुंबई, दि.३ (क्री.प्र.)- शरीरसौष्ठव या कलेचा थरार, शक्ती-सौंदर्याचे दिमाखदार दर्शन, आणि मैदानावर उसळलेला उत्साहनवोदित मुंबई श्रीच्या सोहळ्याने गोरेगावच्या शास्त्रीनगर मैदानावर अक्षरशः क्रीडा इतिहास रचला.

 

स्पर्धा नवोदितांची असली, अनुभव अपुरा असला तरी दमदार कामगिरीची चमक आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांसारखी झळकत होती. संघटनेने दीडशे स्पर्धकांची अपेक्षा धरली होती, पण आकड्याने उडी मारत थेट २३५ शरीरसौष्ठवपटूंनी मैदान गाजवले!


त्यात क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद तर अविश्वसनीय — मैदानाची क्षमता २ हजार असूनही ३ हजारांपेक्षा अधिक दर्दी स्पर्धेचा साक्षीदार बनण्यासाठी गर्दी करून उभे होते. रात्री अकराच्या ठोक्याला नवोदित मुंबई श्रीचा निर्णय झाला आणि विराज फिटनेसचा साजिद मलिक या मानाचा ताज आपल्या डोक्यावर घालून विजयी झाला. ७० किलो वजनी गटात अमन भौमिकवर मात करत गटातही एक नंबर मिळवलेला साजिद संपूर्ण स्पर्धेत चमकून उठला. साजिदच्या विजयावेळी सभागृह दुमदुमून गेले—हजारो टाळ्यांचा आवाज विजेत्याचा सन्मान ठरला.

 


प्रत्येक गटात ४०-४५ खेळाडू तर ६० किलो आणि ६५ किलो वजनीगटात स्पर्धकांच्या संख्येने अर्धशतक ओलांडले होते. या प्रचंड संख्येमुळे टॉप फाइव्ह निवडताना पंचांची चांगलीच पंचाईत झाली. ५५ किलो वजनी गटात इतकी चुरस होती की अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना तीन-तीनदा कंपेरिजन करावी लागली. तसेच त्यांच्यात क्रमांक ठरविताना आणखीनच डोकेफोड करावी लागली. दर्शन सावंत आणि अर्णव वाघ या जोडीला मागे टाकत बोवलेकर जिमचा रमण राठोड सरस ठरला. ६० किलो वजनी गटात धर्मराज जमादारने  बाजी मारली. ६५ किलोमध्ये प्रतिक महाजन, ७० किलोत खुद्द साजिद मलिक आणि ७५ किलोवरील वजनी गटात परब फिटनेसचा फ्रान्सिसको फर्नांडिस अव्वल आला. ७० किलो वजनी गटात अमन भौमिकवर मात करत गटात पहिला आलेला साजिद मलिकच स्पर्धेचा विजेता ठरला.

 

 स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक अजय विचारे, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, किरण कुडाळकर, राजेश निकम, राकेश पांडे, जयदीप पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. तर नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता विक्रांत देसाई निलेश दगडे, उमेश गुप्ता, हर्मीत सिंग, संदीप सावळे, मनोज बोचरे, संतोष भरणकर, विशाल धावडे यांसारखे वरिष्ठ शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते.

 

 


नवोदित मुंबई श्री २०२५ स्पर्धेचा निकाल

 

५५ किलो वजनी गट : १. रमण राठोड (बोवलेकर जिम), २. दर्शन सावंत (जय भवानी जिम), ३.अर्णव वाघ (जेडी फिटनेस), ४. अनिकेत कदम (परब फिटनेस), ५. सोयल मोहम्मद (बाबा फिटनेस).

 

६० किलो वजनी गट : १. धर्मराज जमादार (एम जे ५२ फिटनेस), २. निशांत नांदिवडेकर (श्री दत्तगुरु जिम) ३. रितिक वेरुळकर (पॉवर  पॉइंट जिम), ४. चेतन सुतार (श्रीराम जिम), ५. ओम मिस्त्री (बोवलेकर जिम).

 

६५ किलो वजनी गट : १. प्रतिक महाजन (विराज फिटनेस), २. संकेत शिगवण (फिट अँड फाईन), ३. निखिल सावंत (आय क्यू फिटनेस), ४) ब्रॅण्डन डिसूजा (परब फिटनेस), ५. भावेश भंगेरा (शोयब जिम)

 

७० किलो वजनी गट : १. साजिद मलिक( विराज फिटनेस), २. अमन भौमिक ( बॉडी वर्कशॉप), ३. अनिकेत राठोड (कृष्णा जिम), ४. हिमांशू मकवाना (बॉडी वर्कशॉप), ५. रोहन मंगेला (पालकर जिम).

 

७५ किलो वजनी गट : १.हरीश साळुंखे (परब फिटनेस), २. सुरेंद्र नाईक (परब फिटनेस), ३.  मनोज माळी (बॉडी वर्कशॉप), ४. सचिन राणे (जय भवानी जिम), ५. पंकज कुमार (पी आर पॉवर फिटनेस).

 

८० किलो वजनी गट : १. फ्रान्सिसको फर्नांडिस (सावरकर जिम). २. रहमतुल्लाह ( आदियांश जिम), ३. शुभम ठाकरे (शिवशक्ती जिम),  ४. रितिक पालव  (बॉडी वर्कशॉप), ५. पवन डंबे (श्री दत्तगुरु जिम).

 

८० किलोवरील वजनी गट : १. तुषार वाघ ( एज फिटनेस), २. सय्यद फकरुद्दीन (बालमित्र जिम), ३. जमालुद्दीन सय्यद (आर्यन पॅराडाइज), ४. अजय कुमार वर्मा (आर्यन पॅराडाइज), ५. रियान कोळी ( श्री गुरुदत्त जिम).

 

नवोदित मुंबई श्री : साजिद मलिक( विराज फिटनेस)


Post a Comment

0 Comments