Type Here to Get Search Results !

दादरमध्ये कॅरमचा महासंग्राम! ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२०२६ ला आंतरराष्ट्रीय झळाळी कॅरमपटूंनी सजणार मुंबईचा खेळमहोत्सव

 


दादरमध्ये कॅरमचा महासंग्राम!

३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२०२६ ला आंतरराष्ट्रीय झळाळी

कॅरमपटूंनी सजणार मुंबईचा खेळमहोत्सव

 

कॅरमप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणारी, महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२०२६ येत्या २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी मुंबईच्या दादरमध्ये रंगणार असून देश-विदेशातील दिग्गज कॅरमपटूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा अक्षरशः कॅरमचा महाकुंभ ठरणार आहे.

 

आयोजन व स्थळ : वातानुकूलित सभागृहात भव्य कॅरम रणसंग्राम

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने आयोजित ही स्पर्धा श्री हालरी विसा ओसवाल समाज वातानुकूलित हॉल, रणजीत स्टुडिओ समोर, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४ येथे होणार असून खुल्या गटात खेळवली जाणारी ही स्पर्धा असल्याने पुरुष व महिला खेळाडू प्रथमच एकत्रितपणे आपली कौशल्ये आजमावणार आहेत.

 

सहभाग : १७ राज्ये व ३ देशांतील खेळाडूंची मांदियाळी

या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, बंगाल, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पॉंडिचेरी, ओरिसा व झारखंड अशा एकंदर १७ राज्यांतील खेळाडू सहभागी होत आहेत. याशिवाय कॅनडा, श्रीलंका व मालदीव येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग स्पर्धेला जागतिक उंची देणारा ठरणार आहे.

 

प्रायोजक व साहित्य : दर्जेदार सुविधांची हमी

भारतीय आयुर्विमा महामंडळ हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून इंडियन ऑइल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, यूनियन बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, मड जीन्स व बार्बेक्यू नेशन यांचे पुरस्कार लाभले आहेत. सिस्का कॅरम कंपनी ही साहित्य पार्टनर असून स्पर्धेत एकंदर ४८ शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट कॅरम सोंगट्या वापरण्यात येणार आहेत.

 

स्पर्धा रचना : १६ सत्रांत रंगणारे थरारक सामने

स्पर्धेचा पहिला दिवस सकाळी ९ वाजता सुरू होणार असून पहिल्या दिवशी १० सत्रे, तर दुसऱ्या दिवशी ६ सत्रांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी खेळाडूस टी-शर्ट / गणवेश देण्यात येणार आहे. या भव्य आयोजनासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यकारिणी अथक परिश्रम घेत आहे.

 

पारितोषिके : ८ लाखांची बक्षीसांची बरसात

स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकंदर ८ लाख रुपये रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक१ लाख ५० हजार व चषक, द्वितीय क्रमांक१ लाख व चषक, तृतीय क्रमांक७५ हजार व चषक, चौथा क्रमांक५० हजार. उपउपान्त्य फेरी२५ हजार, उपउपांत्यपूर्व फेरी१० हजार, तर त्याआधी पराभूत होणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी ५ हजार असे एकंदर ३२ खेळाडूंना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्यास प्रत्येकी १ हजार, तर उपउपांत्य फेरीपासून प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

 

महिला खेळाडूंना प्रोत्साहन : अतिरिक्त बक्षिसांची घोषणा

महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी १ सामना जिंकणाऱ्या महिला खेळाडूस १ हजार, २ सामने – २ हजार, ३ सामने – ४ हजार, ४ सामने – ८ हजार व ५ सामने जिंकणाऱ्या खेळाडूस १५ हजार रुपये अतिरिक्त रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

 

खेळाची कसोटी : सहा बोर्ड, तीन सेट व आक्रमक खेळ

स्पर्धेत सहा बोर्डांचे ३ सेट खेळविण्यात येणार असून प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीला थेट स्ट्रायकर लावण्यास व कठीण करण्यास मज्जाव असल्याने खेळाडूंची खरी कस लागणार आहे आणि कॅरम रसिकांना अधिक आक्रमक व थरारक खेळ पाहायला मिळणार आहे.

 

स्टार आकर्षण : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिग्गजांचा सहभाग

महाराष्ट्राचे विश्व विजेते योगेश परदेशी, संदीप दिवे, विद्यमान विश्व कप विजेता प्रशांत मोरे तसेच तेलंगणाचा माजी विश्व कप विजेता के. श्रीनिवास हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहेत. याशिवाय आय सी एफ कप विजेता रियाझ अकबर अली (महाराष्ट्र), इर्शाद अहमद (विदर्भ), फेडरेशन कप विजेता जनार्धन रेड्डी (तेलंगणा), राष्ट्रीय विजेता झहीर पाशा (कर्नाटक), महम्मद आरिफ (उत्तर प्रदेश), आर. आरोक्यराज (तामिळनाडू) यांच्या सहभागामुळे स्पर्धेत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

 

महाराष्ट्र व महिला खेळाडूंची दमदार उपस्थिती

महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू महम्मद घुफ्रान, संदीप देवरुखकर, योगेश धोंगडे, अभिजित त्रिपनकर, प्रकाश गायकवाड, जितेंद्र काळे, दिलेस खेडेकर तसेच महिला खेळाडू काजल कुमारी, आकांक्षा कदम, अंबिका हरिथ, संगीता चांदोरकर आणि पॉंडिचेरीची वी. पूजा आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत.

 

आंतरराष्ट्रीय रंगत : विदेशी खेळाडूंची दमदार एंट्री

कॅनडाचा लुईस फेर्नांडीस, श्रीलंकेचे अनास अहमद, शाहिद हिलमी, महिला खेळाडू रोशिता जोसेफ, हिरूशी मालशानी, तशमीला काविंदी तसेच मालदीवचे इस्माईल आझमीन व इब्राहिम हुज्जन अली या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूंमुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे.

 

थेट प्रक्षेपण व समालोचन : रसिकांसाठी खास व्यवस्था

सभागृहातील गर्दी लक्षात घेता एकावेळी २ सामने स्क्रीनवर दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून एकावेळी ६ सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार असून प्रसन्ना संत व मंदार बर्डे मराठी, इंग्रजी व हिंदीतून धावते समालोचन करणार आहेत.

 

पंच व तांत्रिक व्यवस्था : अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती

स्पर्धेसाठी चंदीगडचे आंतरराष्ट्रीय पंच महेश सेखरी यांची तांत्रिक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकार हे प्रमुख पंच म्हणून काम पाहणार असून दिल्लीचे राष्ट्रीय पंच कुमार अजय महाराष्ट्राचे राष्ट्रीय पंच सूर्यकांत पाटील हे सहाय्यक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.


Post a Comment

0 Comments