Type Here to Get Search Results !

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा मुंबई व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा उपांत्य फेरीत 'रेल्वे'चा रूबाब, तर ओम साईश्वर सेवा मंडळ व 'विद्यार्थी क्रीडा केंद्रा' चा धडाका ​मध्य व पश्चिम रेल्वेची अंतिम फेरीत धडक ४ फूट ११ इंच गटात ओम साईश्वर सेवा मंडळ वि विद्यार्थी क्रीडा केंद्र लढणार लाल मैदानावर खो-खोचा महाथरार! अटीतटीच्या लढतींनी प्रेक्षकांचे डोळे दिपले! लालमैदान गाजले! प्रेक्षक भारावले!!


विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा

मुंबई व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

उपांत्य फेरीत 'रेल्वे'चा रूबाब, तर ओम साईश्वर सेवा मंडळ व  'विद्यार्थी क्रीडा केंद्रा' चा धडाका

मध्य व पश्चिम रेल्वेची अंतिम फेरीत धडक

 ४ फूट ११ इंच गटात ओम साईश्वर सेवा मंडळ वि विद्यार्थी क्रीडा केंद्र लढणार

लाल मैदानावर खो-खोचा महाथरार! अटीतटीच्या लढतींनी प्रेक्षकांचे डोळे दिपले!

लालमैदान गाजले! प्रेक्षक भारावले!!

 

मुंबई (क्रि. प्र.) : मुंबईच्या लाल मातीत खेळाडूंच्या अफाट चपळाईने, अचूक आक्रमण आणि श्वास रोखून धरणाऱ्या अटीतटीच्या लढतींनी अक्षरशः थराराचा कळस गाठला. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने व विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रेक्षकांचे डोळे दिपले. सेंट्रल रेल्वे, पश्चिम रेल्वे, रचना नोटरी वर्क्स, विद्यार्थी क्रीडा केंद्र आणि ओम साईश्वर सेवा मंडळ या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत अंतिम फेरीकडे दमदार वाटचाल केली. पुरुष विभागात सेंट्रल रेल्वे व पश्चिम रेल्वे अंतिम फेरीत भिडणार असून ४ फूट ११ इंच गटात ओम साईश्वर सेवा मंडळ व विद्यार्थी क्रीडा केंद्र यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे.

 

पहिली उपांत्य फेरी – सेंट्रल रेल्वेची ‘रचना’वर मात

पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट्रल रेल्वेने रचना नोटरी वर्क्स संघाचा १३-११ असा एक डाव राखून २ गुणांनी पराभव करत आपला दबदबा सिद्ध केला. विजयी सेंट्रल रेल्वेकडून रामजी कश्यप (नाबाद ३ मि. संरक्षण व २ गुण), विजय हजारे (२:२० मि. संरक्षण व २ गुण), आकाश तोगरे (२:२० मि. संरक्षण), अवधूत पाटील (२:२० मि. संरक्षण), मिलिंद चावरेकर (१:२० मि. संरक्षण व ३ गुण), सुयश गरगटे (१:२० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी संघाला विजयाकडे नेले. पराभूत रचनाकडून हितेश आंग्रे (२ गुण), सिद्धेश चिकने (१:१० व १:१० मि. संरक्षण व २ गुण), गणेश साहू (१:२० मि. संरक्षण), यश बोरकर (२ गुण) यांनी कडवी झुंज दिली.


दुसरी उपांत्य फेरी – पश्चिम रेल्वेचा थरारक विजय

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पश्चिम रेल्वेने अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र पोस्टवर २:३० मिनिटे शिल्लक राखून १२-११ असा १ गुणाने विजय मिळवला. विजयी पश्चिम रेल्वेकडून राहुल मंडल (२ मि. संरक्षण व ३ गुण), महेश शिंदे (१ व २:३० मि. संरक्षण), आदित्य गणपुले (१:१० व २:४० मि. संरक्षण व १ गुण), निखील सोडये (२:४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी निर्णायक कामगिरी केली. महाराष्ट्र पोस्टकडून अक्षय म्हासाळ (१:१० मि. संरक्षण व २ गुण), लक्ष्मण गावस (१:३० व १ मि. संरक्षण व १ गुण), हर्षद हातणकर (१:३० व १ मि. संरक्षण व १ गुण), सनी तांबे (३ गुण) यांनी शेवटपर्यंत झुंज दिली.

 

महिला विभाग – रचना नोटरी वर्क्सची अंतिम फेरीत झेप

महिलांच्या उपांत्य सामन्यात रचना नोटरी वर्क्सने मुंबई पोलीस संघावर ५-४ असा १ गुणाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. विजयी रचनाकडून गितांजली नरसाळे (नाबाद ४:५० व ४:५० मि. संरक्षण), काजल शेख (४:१० व २ मि. संरक्षण व १ गुण), साक्षी वाफेलकर (१:३० मि. संरक्षण व २ गुण), शेजल यादव (२ गुण) यांनी प्रभावी खेळ केला. पराभूत मुंबई पोलीसकडून पायल पवार (३:१० मि. संरक्षण व १ गुण), प्रिया भोर (४:५० व १:४० मि. संरक्षण), दीक्षा सोणसुरकर (४ मि. संरक्षण व २ गुण), श्रेया सनगरे (३:२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगली लढत दिली.

 


४ फूट ११ इंच गट – विद्यार्थी क्रीडा केंद्राचा दणदणीत विजय

४ फूट ११ इंच मुलांच्या गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर १०-४ असा एक डाव राखून ६ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. विजयी विद्यार्थीकडून विघ्नेश जाधव (५ मि. संरक्षण व २ गुण), सार्थक जाधव (३:५० मि. संरक्षण व १ गुण), अंशुमन भिडे (१:३० मि. संरक्षण व २ गुण), आर्यन परवडी (१:२० मि. संरक्षण व २ गुण), कार्तिक चोडणकर (२ मि. संरक्षण व १ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. ओम समर्थकडून श्रीयांश ताम्हणकर (१:२० मि. संरक्षण), गौरांग जोशी (१:१० मि. संरक्षण व १ गुण), ईशान देसाई (१:१० मि. संरक्षण) यांनी प्रतिकार केला.

 

४ फूट ११ इंच गट – ओम साईश्वर सेवा मंडळाची सरशी

दुसऱ्या कनिष्ठ गटाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबवर ११-५ असा एक डाव राखून ६ गुणांनी विजय मिळवला. ओम साईश्वरकडून आरव साटम (५ मि. संरक्षण व ३ गुण), श्लोक जाधव (२:१० मि. संरक्षण व १ गुण), शंतनू रावराणे (२:४० मि. संरक्षण), रुद्र कासुरकर (१:३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. वैभव स्पोर्ट्सकडून पुष्कर देवळेकर (१:४० मि. संरक्षण व २ गुण), अनिकेत गुप्ता (१:४० मि. संरक्षण व १ गुण), पियुष पाटील (१:१० मि. संरक्षण) यांनी झुंज दिली.

Post a Comment

0 Comments