Type Here to Get Search Results !

‘डायनॅमिक’ खो-खोचा जल्लोष; अजितदादा पवार क्रीडा नगरीत उपांत्य फेरीची रणधुमाळी रंगणार ! कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत पुरुष गटात पश्चिम रेल्वे वि बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया वि महाराष्ट्र पोष्ट; महिला गटात थरारक साखळी सामने दादर दणाणलं, खो-खोचा जंगी महायुद्ध सुरू!


डायनॅमिक’ खो-खोचा जल्लोष; अजितदादा पवार क्रीडा नगरीत उपांत्य फेरीची रणधुमाळी रंगणार !

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत पुरुष गटात पश्चिम रेल्वे वि बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया वि महाराष्ट्र पोष्ट; महिला गटात थरारक साखळी सामने

दादर दणाणलं, खो-खोचा जंगी महायुद्ध सुरू!

 


मुंबई : दादरच्या कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत सध्या ‘डायनॅमिक’ व्यावसायिक खो-खोचा अक्षरशः ज्वालामुखी उसळला आहे! वेग, चपळाई, डावपेच आणि जिद्दीचा संगम अनुभवण्यासाठी मुंबईतील खो-खोप्रेमी मोठ्या संख्येने मैदानावर हजेरी लावत आहेत. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत पुरुष गटात पश्चिम रेल्वे वि बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बँक ऑफ इंडिया वि महाराष्ट्र पोष्ट उपांत्य फेरीत भिडणार असून महिला गटात महावितरण वि मुंबई पोलीस पश्चिम रेल्वे वि मुंबई पोलीस यांच्यात शेवटचे साखळी सामने रंगणार आहेत. महिला गटात पश्चिम रेल्वे अव्वल स्थाणार असून, त्यापाठोपाठ मुंबई पोलीस महावितरण अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

 


पुरुष उपांत्यपूर्व : पश्चिम रेल्वेची नेवल डॉकवर विजयी झेप

या सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले आणि २५-१७ असा ६ मि. राखून ८ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. विजयी पश्चिम रेल्वेच्या वृषभ वाघ (२.५० मि. संरक्षण), आदित्य गणपुले (१.५० मि. संरक्षण व ६ गुण), मजहर जमादार (१.४० मि. संरक्षण व २ गुण), अमित पाटील (१.४५ मि. संरक्षण व ४ गुण), निखील सोडये (नाबाद १.४० मि. संरक्षण) यांनी उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले. पराभूत नेवल डॉकच्या वैभव मोरे (१.३५ मि. संरक्षण व २ गुण), शुभम दगडे (४ गुण), प्रथम चौगुले (१.१० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक जुनघरे (१.१० मि. संरक्षण व २ गुण) यांची झुंज अपुरी पडली. या सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

 


पुरुष उपांत्यपूर्व : महाराष्ट्र पोष्टाचा महावितरणवर निसटता विजय

या सामन्यात महाराष्ट्र पोष्टाने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले आणि २९-२५ असा ४ गुणांनी निसटता विजय मिळवला. विजयी महाराष्ट्र पोष्टाच्या लक्ष्मण गवस (२ मि. संरक्षण व १२ गुण), शुभम उत्तेकर (१.१५ मि. संरक्षण व ६ गुण), सनी तांबे (१.३० मि. संरक्षण व २ गुण), आकाश साळवे (१.४०, नाबाद १.१० मि. संरक्षण) यांनी दमदार खेळ केला. पराभूत महावितरणच्या प्रतिक वाईकर (२.५० मि. संरक्षण व २ गुण), सम्यक जाधव (६ गुण), ऋषिकेश मुर्चावडे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), अनिकेत चेंदवनकर (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), वरुण पाटील (१.४० मि. संरक्षण) यांनी चुरशीची लढत दिली. या सामन्यावर रवी सोनावणे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

             



महिला साखळी : मुंबई पोलिसांचा महावितरणला महाशिवरात्रीचा झटका

या सामन्यात महावितरणने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले, मात्र २४-१८ असा ५.१० मि. राखून ६ गुणांनी मुंबई पोलिसांनी विजय मिळवला. विजयी मुंबई पोलिसांच्या पायल पवार (३.२० मि. संरक्षण व ४ गुण), प्रिया भोर (नाबाद १.४०, १.१४ मि. संरक्षण), श्रेया सनगरे (२ मि. संरक्षण व ४ गुण), दिक्षा सोनसुतकर (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. पराभूत महावितरणच्या देविका अहिरे (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), प्रिया पाटील (२.१० मि. संरक्षण), रोशनी जुनघरे (६ गुण), प्रिती हलगरे (४ गुण) यांची झुंज अपुरी ठरली. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

         

महिला साखळी : पश्चिम रेल्वे कडून महावितरण कंपनीचा ३०-१४ असा धुव्वा

या सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले आणि ३०-१४ असा १ डाव १६ गुणांनी महावितरण कंपनीचा धुव्वा उडवला. विजयी पश्चिम रेल्वेच्या मगाई माझी (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), तेजस्वी के. आर. (२.५० मि. संरक्षण), संध्या सुरवसे (२.०५ मि. संरक्षण), दिव्या गायकवाड (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), सुहानी धोत्रे (१४ गुण) यांनी धमाकेदार कामगिरी करत विजय साकारला. पराभूत महावितरणच्या प्रिती हलगरे (१.२० मि. संरक्षण), मानसी आंबोकर (१ मि. संरक्षण), मीना कांबळे (२ गुण), देविका अहिरे (२ गुण) यांची कामगिरी फिकी पडली. या सामन्यावर विराज कोठमकर यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

 

उपांत्य फेरीत रंगणार महासंग्राम

व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेतील प्रत्येक सामना अधिकाधिक रंगतदार होत असून आता उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र पोष्ट यांच्यात खऱ्या अर्थाने विजेतेपदासाठी महासंग्राम रंगणार आहे. महिला गटातही अव्वल स्थानासाठी संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दादरच्या क्रीडा नगरीत सध्या खो-खोचा उत्सवच साजरा होत आहे!


Post a Comment

0 Comments