Type Here to Get Search Results !

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धा स्वामी समर्थच्या स्पर्धेत थरारक चढाया स्वामी समर्थ कबड्डीत पहिल्याच दिवशी दमदार प्रदर्शन चढाई-पकडीच्या युद्धात इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक विजयी सलामी

 


राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धा

स्वामी समर्थच्या स्पर्धेत थरारक चढाया

स्वामी समर्थ कबड्डीत पहिल्याच दिवशी दमदार प्रदर्शन

चढाई-पकडीच्या युद्धात इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक विजयी सलामी

मुंबई, (क्री. प्र.)प्रभादेवीतील चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरी कबड्डीच्या जल्लोषाने अक्षरशः दणाणून गेली आणि स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थराराचा स्फोट झाला. प्रत्येक चढाईसोबत प्रेक्षकांचे श्वास रोखले जात होते, तर पकडींच्या झुंजार लढतींनी मैदानावर अक्षरशः रणसंग्राम रंगला. आघाडी-पिछाडीच्या नाट्यमय घडामोडी, शेवटच्या क्षणाला उलटलेले सामने आणि एका गुणावर ठरलेले निकाल यामुळे कबड्डीप्रेमींना रोमांचक अनुभव मिळाला. पहिल्याच दिवशी इच्छाशक्ती क्रीडा मंडळ, एसएसजी फाउंडेशन, पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि अंकुश स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

 


उद्घाटनानंतर इच्छाशक्तीची झंझावाती कामगिरी

टी-२० विश्वचषकाच्या गदारोळानंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या या कबड्डी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, स्पर्धा संयोजक व आमदार महेश सावंत आणि मुंबई शहर कबड्डी संघटनेचे विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. लायन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्धच्या सामन्यात यश निंबाळकर आणि योगेश राठोड यांच्या वेगवान चढायांनी इच्छाशक्तीला ३६-२० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या डावात राज आचार्य आणि विशाल कटकटे यांनी झुंजार खेळ करत लायन्सला पुन्हा सामन्यात आणले. एका क्षणी २०-३६ पिछाडीवर असलेल्या लायन्सने इच्छाशक्तीवर लोन चढवत धावसंख्या ४१-३९ पर्यंत नेली. अखेर शेवटच्या क्षणी इच्छाशक्तीने ४२-४० अशी निसटती बाजी मारत रोमांचक विजय मिळवला.

 


पंकज मोहितेचा वादळी खेळ, एसएसजीचा एकतर्फी विजय

प्रो कबड्डीतील सुपरस्टार्सच्या उपस्थितीने स्पर्धेची रंगत आणखी वाढली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेल्वेला अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या पंकज मोहितेने एसएसजी फाउंडेशनसाठी अक्षरशः वादळी खेळ केला. त्याच्या ११ गुणांच्या झंझावाती चढायांमुळे एसएसजीने प्रतिस्पर्ध्यावर ५३-३१ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयात सूरज जाधव, तेजस टक्के आणि आशिष चौधरी यांनीही दमदार साथ देत संघाचा विजय अधिक भक्कम केला.

 


सुशांत साहिलच्या पकडींनी अंकुशची बाजी

अंकुश स्पोर्ट्स क्लब आणि सिद्धीप्रभा फाउंडेशन यांच्यातील लढतही तितकीच रंगतदार ठरली. अंकुशच्या बचावफळीतील सुशांत साहिल याने तुफानी पकडी करत संघाला ३४-२७ असा शानदार विजय मिळवून दिला. सिद्धीप्रभाकडून रुपेश साळुंखेने अष्टपैलू खेळ करत १६ गुणांची कमाई केली; मात्र त्याचा झुंजार प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरा ठरला.

 


पार्ले स्पोर्ट्सचा शेवटच्या क्षणी निसटता विजय

पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि गोल्फादेवी सेवा मंडळ यांच्यातील लढत शेवटच्या क्षणापर्यंत रंगली. अक्षय तावडे आणि प्रशांत पवार यांच्या खेळाने पार्लेला जोर मिळाला, तर गोल्फादेवीकडून धनंजय सरोज आणि शार्दुल हरचेकर यांच्या चढायांनी पहिल्या डावात १८-१८ अशी बरोबरी साधली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी झुंज दिली. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पार्ले स्पोर्ट्स क्लबने ३५-३४ असा निसटता विजय मिळवला. त्यानंतर पार्लेने आपल्या दुसऱ्या सामन्यात अमर क्रीडा मंडळाचा ४५-२८ असा पराभव करत दुसरा विजयही नोंदवला.

 


इच्छाशक्ती-गुड मॉर्निंग सामन्यात थराराचा कळस

इच्छाशक्ती क्रीडा मंडळ आणि गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना तर थराराचा कळस ठरला. यश निंबाळकरच्या वेगवान चढायांनी इच्छाशक्तीला २४-१६ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसऱ्या डावात गुड मॉर्निंगच्या शार्दुल पाटीलने तुफानी चढायांनी सामना पालटला. त्याने १६ गुणांची कमाई करत सामना शेवटच्या मिनिटाला ४१-४० असा आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता. निर्णायक क्षणी पुन्हा यश निंबाळकरने शेवटच्या चढाईत दोन गुण मिळवत इच्छाशक्तीला आघाडी दिली. मात्र अखेरच्या चढाईत शार्दुल पाटीलने एक गुण मिळवत सामना ४२-४२ असा बरोबरीत सोडवला आणि मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी या थराराला जोरदार दाद दिली.



Post a Comment

0 Comments