Type Here to Get Search Results !

भारताने टी–२० विश्वचषकावर पुन्हा मोहोर उमटवली! न्युझीलंडवर ९६ धावांचा दणदणीत विजय भारतीय संघाचा दणदणीत विश्वविजय सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने राखले जगज्जेतेपद लेखक : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार – सुहास जोशी

 


भारताने टी–२० विश्वचषकावर पुन्हा मोहोर उमटवली!

न्युझीलंडवर ९६ धावांचा दणदणीत विजय

भारतीय संघाचा दणदणीत विश्वविजय

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने राखले जगज्जेतेपद

लेखक : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार – सुहास जोशी

 

भारत–श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० व्या टी–२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतीय संघाने पुन्हा एकदा जगज्जेतेपदावर आपली मोहोर उमटवत इतिहास घडवला! अंतिम सामन्यात भारताने धोकादायक न्युझीलंड संघाचा तब्बल ९६ धावांनी धुव्वा उडवत मागील विजेतेपद कायम ठेवले. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही अंगात वर्चस्व गाजवत प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही. या विजयासह भारत टी–२० विश्वचषकाचे जेतेपद राखणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ ठरला असून ३ वेळा विजेतेपद जिंकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. तसेच यजमान देश म्हणून ही स्पर्धा जिंकणारा पहिला देश ठरण्याचा मानही भारताने मिळवला.

 

सॅमसन, अभिषेक आणि किशनची झंझावाती फलंदाजी

अंतिम सामन्यात भारताच्या विजयाचा पाया रचला तो फलंदाजांनी. संजु सॅमसनने ८९ धावांची तुफानी खेळी, अभिषेकने ५२ धावा, तर ईशान किशनने ५४ धावांची शानदार खेळी करत भारताला भक्कम धावसंख्या उभारून दिली. या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने प्रतिस्पर्ध्यांवर सुरुवातीपासून दबाव निर्माण केला. भारतीय संघाच्या दमदार फलंदाजीपुढे न्युझीलंडचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले.

 

बुमराह आणि अक्षर पटेलची निर्णायक गोलंदाजी

फलंदाजांनी भक्कम पाया घातल्यानंतर गोलंदाजांनीही आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. जसप्रित बुमराहने ४ बळी, तर अक्षर पटेलने ३ बळी घेत न्युझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. अक्षर पटेलने तिसऱ्या षटकात न्युझीलंडचा धोकादायक सलामीवीर फिन अॅलनला अवघ्या ९ धावांवर बाद करत प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का दिला. २५६ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्युझीलंडची अवस्था बिनबाद ३१ वरून ३ बाद ४७ अशी झाली आणि तेथून भारतीय विजय जवळजवळ निश्चित झाला.

 

संजु सॅमसन ‘मालिका वीर’, बुमराह सर्वोत्तम खेळाडू

या स्पर्धेत सलग उत्कृष्ट खेळी करत संजु सॅमसनने शेवटच्या ३ सामन्यांत अर्धशतके झळकावत भारताला विजय मिळवून दिला, त्यामुळे त्याला मालिका वीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. अंतिम सामन्यातील अफलातून गोलंदाजीबद्दल जसप्रित बुमराहला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला.

 

उपांत्य फेरीतील थरारक सामने

स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्युझीलंडने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात फिन अॅलनने अवघ्या ३३ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह विक्रमी शतक झळकावले. त्याला सेफर्टने ५८ धावांची साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करत सामना एकतर्फी केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला. संजु सॅमसनच्या ८९ धावा, तसेच किशन ३९, दूबे ४३, पांड्या २७, वर्मा २१ धावा यांच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ बाद २५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा बेथेल १०५ धावांची शतकी खेळी करूनही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

 

सुपर एट’पासून भारताचा विजयाचा झंझावात

स्पर्धेच्या सुरुवातीला भारताला अपेक्षित सुर सापडला नव्हता. पण सुपर एट’ टप्प्यापासून भारतीय संघाचा खेळ जबरदस्त बहरला. झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांनी विजय, वेस्टइंडीजविरुद्ध संजु सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीमुळे विजय, तर गट फेरीत नामिबियावर ९७ धावांनी विजय, पाकिस्तानवर सहज मात, आणि हॉलंडचा पराभव करत भारताने गटात अव्वल स्थान मिळवले.

 

स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल

या विश्वचषकात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत खळबळ उडवली, तर इटलीने नेपाळचा पराभव करत आश्चर्याचा धक्का दिला. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना दोन ‘सुपर ओव्हर’नंतर दक्षिण आफ्रिकेने जिंकला. तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून पराभूत केले; त्या सामन्यात पथुम निशांकाच्या नाबाद शतकी खेळीने विजय निश्चित केला.

 

भारतीय क्रिकेटचा जागतिक दबदबा

गेल्या १८ महिन्यांत भारताने २ टी–२० विश्वचषक, वनडे चॅम्पियन्स स्पर्धा, महिला वनडे विश्वचषक आणि १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत. या सलग विजयांमुळे भारतीय क्रिकेटचा जागतिक दबदबा अधोरेखित झाला आहे. आज भारतीय संघ एका खेळाडूवर अवलंबून न राहता सांघिक कामगिरीच्या जोरावर मैदानात उतरतो, हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे.

 

हॅटट्रिककडे भारताची नजर

या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर आता पुढील स्पर्धेकडे लागली आहे. भारताने पुढील टी–२० विश्वचषकही जिंकला, तर जेतेपदाची आगळीवेगळी हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी त्यांच्यासमोर असेल. सातत्य, जिद्द आणि सांघिकतेच्या बळावर भारतीय संघाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की क्रिकेटच्या विश्वात भारताचा झेंडा अभिमानाने फडकत आहे.


Post a Comment

0 Comments