ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी
स्पर्धा - २०२६
किशोर गटात राजश्री छत्रपती शाहू व छत्रपती शिवाजी
तर किशोरी गटात ज्ञानशक्ती मंडळ व किल्ले माऊली अंतिम फेरीत
महिलांत ज्ञानशक्ती युवा आणि ओम् वर्तकनगर उपांत्य फेरीत
खारलँड मैदानावर कबड्डीचा जबरदस्त थरार
ठाणे : ठाणे
जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आणि ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा –
२०२६ मध्ये तरुण खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत मैदान दणाणून सोडले. कळवा,
खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर
सुरू असलेल्या या स्पर्धेत किशोर गटात राजश्री छत्रपती शाहू आणि छत्रपती शिवाजी,
तर किशोरी गटात ज्ञानशक्ती मंडळ आणि किल्ले माऊली
यांनी दमदार खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला. याचबरोबर
महिलांच्या गटात ज्ञानशक्ती युवा आणि ओम् वर्तकनगर यांनी उपांत्य फेरी गाठून स्पर्धेची रंगत अधिक वाढवली.
राजश्री छत्रपती शाहूची दमदार कामगिरी
किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात राजश्री छत्रपती शाहू संघाने श्री हनुमान सेवा संघाचा ४१-३३ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. विश्रांतीला
२२-१६ अशी आघाडी घेतलेल्या शाहू संघाने उत्तरार्धातही आक्रमक खेळ
कायम ठेवत ८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. हिमांशु जैसवाल आणि कृष्णा सोनदिया यांच्या तुफानी चढायांना शनिकुमार हरिजन व अभिमन्यू यादव यांच्या भक्कम पकडीची साथ लाभली. श्री हनुमान संघाकडून
वेदान्त शिंदे,
सायमन पवार
आणि साहिल जळगावकर यांनी कडवी झुंज दिली.
छत्रपती शिवाजीचा अविनाश मंडळावर विजय
दुसऱ्या उपांत्य सामन्यात छत्रपती शिवाजी संघाने अविनाश मंडळावर ४३-३४ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. पहिला लोण देत छत्रपती शिवाजीने पूर्वार्धात २२-०९ अशी मोठी आघाडी घेतली. उत्तरार्धात अविनाश मंडळाने त्या
लोणची परतफेड करत सामना रंगतदार केला. छत्रपती शिवाजी संघाकडून
अमित गुप्ता,
अभव वर्मा
आणि लकी ढोंगे यांनी प्रभावी खेळ केला, तर अविनाश मंडळाकडून प्रियांशु राजपूत, प्रित म्हात्रे आणि दीपक कानोजिया यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
किशोरी गटात ज्ञानशक्ती मंडळाचा शानदार पलटवार
किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात ज्ञानशक्ती मंडळाने पहिल्या डावातील १४-१५ अशा पिछाडीवरून शानदार पुनरागमन करत जय आंबे मंडळाला ३४-३० असे पराभूत केले. जय आंबे संघाकडून जान्हावी पार्टे, मानसी गावकर आणि ऐश्वर्या खैरे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे पहिल्या डावात
१ गुणांची आघाडी
मिळाली होती. मात्र उत्तरार्धात निधी राजोळे, हिमानी गायकवाड आणि धानी राणे यांनी आक्रमक खेळ करत लोण देत ज्ञानशक्ती मंडळाला विजय मिळवून दिला.
किल्ले माऊलीची प्रभावी सरशी
दुसऱ्या उपांत्य सामन्यात किल्ले माऊली संघाने जय भारत स्पोर्टस् संघाचा ३८-२४ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला
१४-०९ अशी आघाडी घेतलेल्या किल्ले माऊलीने उत्तरार्धातही खेळातील
जोश कायम ठेवत १४ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयात मयुरी जोशी हिचा झंझावाती खेळ निर्णायक ठरला.
महिलांत ज्ञानशक्ती युवा आणि ओम् वर्तकनगर उपांत्य फेरीत
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ज्ञानशक्ती युवा संघाने जय आंबे मंडळाचा ३१-२५ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. जय आंबे संघाकडून
देवयानी पाटील
आणि पल्लवी बनसोडे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे पूर्वार्धात
१६-१३ अशी आघाडी मिळाली होती. मात्र उत्तरार्धात
निधी राजोळे,
सानिया गायकवाड
आणि यतिक्षा लबडे यांनी आक्रमक खेळ करत सामना ज्ञानशक्तीच्या बाजूने फिरवला.
दुसऱ्या सामन्यात ओम् वर्तकनगर स्पोर्टस् संघाने रा. फ. नाईक संघावर ३८-१३ असा दणदणीत विजय मिळवला. वैष्णवी साळुंखे, पूजा जाधव आणि पूर्वा इंगवले यांच्या चढाई-पकडीच्या सर्वांगसुंदर खेळामुळे वर्तकनगरने
प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला. रा. फ. नाईक संघाकडून आरती शेळके हिने चमकदार खेळ केला. या दोन्ही विजयी संघांनी
उपांत्य फेरीत प्रवेश
करून स्पर्धेतील रोमांचकता अधिक वाढवली.
.jpeg)

Post a Comment
0 Comments