Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा – २०२६ प्रथम श्रेणी पुरुषांत शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर उपांत्य फेरीत खारलँड मैदानावर उपांत्य फेरीकडे झेप कबड्डीचा थरार शिगेला


 

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा – २०२६

प्रथम श्रेणी पुरुषांत शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर उपांत्य फेरीत

खारलँड मैदानावर उपांत्य फेरीकडे झेप

कबड्डीचा थरार शिगेला

 

ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आणि ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा – २०२६ मध्ये प्रथम श्रेणी पुरुष गटातील सामने रंगतदार ठरत असून, शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा आणि जय हनुमान-काल्हेर या संघांनी दमदार विजयांची नोंद करत उपांत्य फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर सुरू असलेल्या या लढतींनी प्रेक्षकांना रोमांचित केले.

 

शिवशंकरची ४१-३१ अशी प्रभावी सरशी

प्रथम उपांत्यपूर्व सामन्यात शिवशंकर मंडळाने विजय क्रीडा मंडळाचा ४१-३१ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पूर्वार्धात लोण देत २३-१६ अशी आघाडी घेतलेल्या शिवशंकरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत १० गुणांच्या फरकाने सामना जिंकला. मंगेश सोनावणे आणि सुमित साळुंखे यांच्या धारदार चढायांना तुषार भोईर याच्या अचूक पकडीची साथ लाभली. विजय मंडळाकडून विघ्नेश चौधरी आणि रोनक पाटील यांनी प्रयत्न केले, मात्र पराभव टाळण्यात अपयश आले.

 

जय बजरंग-वाशिंदचा एकतर्फी विजय

दुसऱ्या सामन्यात जय बजरंग-वाशिंद संघाने श्री समर्थ मंडळावर ४१-१९ अशी एकतर्फी मात केली. आक्रमक खेळ करत जय बजरंगने पहिल्याच डावात २ लोण देत २५-०८ अशी मोठी आघाडी घेत विजयाचा पाया भक्कम केला. दुसऱ्या डावात सावध खेळ करत त्यांनी सहज विजय मिळवला. राजू कथोरे आणि दर्शन पवार यांच्या झंझावाती चढायांना अतुल देसले याच्या भक्कम पकडीची साथ लाभली. श्री समर्थकडून ओमकार म्हात्रे यांचा प्रभाव दिसला नाही.

 


मोरया क्रीडाची ५०-२४ अशी दणदणीत कामगिरी

तिसऱ्या सामन्यात मोरया क्रीडा मंडळाने जय बजरंग-खारेगाव संघाचा ५०-२४ असा दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. विश्रांतीपर्यंतच ३ लोण देत ३०-१० अशी मोठी आघाडी घेत मोरयाने सामना आपल्या खिशात टाकला. उत्तरार्धात आणखी एक लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले. परेश हरड, धीरज तरे आणि अजय पाटील यांच्या चढाई-पकडीच्या चतुरस्त्र खेळामुळे हा विजय शक्य झाला. जय बजरंग-खारेगावकडून सोहम मोरे आणि आर्यन पाटील यांना आपल्या खेळाची छाप पाडता आली नाही.

 

जय हनुमान-काल्हेरचा ३७-०८ असा धुव्वा

शेवटच्या सामन्यात जय हनुमान-काल्हेर संघाने हुतात्मा शांतराम संघावर ३७-०८ असा एकतर्फी विजय मिळवला. गौरव पाटील, हर्ष भोईर आणि वैभव पाटील यांच्या तुफानी खेळामुळे हा विजय सहज साकार झाला. त्यांच्या आक्रमक चढाया आणि अचूक पकडींमुळे प्रतिस्पर्ध्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही.

 

उपांत्य फेरीत रंगणार महासंग्राम

या दमदार विजयांमुळे शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा आणि जय हनुमान-काल्हेर या संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले असून, आता पुढील लढती अधिकच चुरशीच्या आणि थरारक ठरणार आहेत. कबड्डीप्रेमींचे लक्ष या निर्णायक टप्प्याकडे लागले असून, विजेतेपदासाठीचा महासंग्राम रंगणार आहे.

Post a Comment

0 Comments