Type Here to Get Search Results !

ब्रम्हा, वाघजाई उपांत्य फेरीत धडक मुंबईचे एसएसजी, पार्ले महोत्सवही अंतिम चौघांत राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डीत रंगणार निर्णायक लढती

 


ब्रम्हा, वाघजाई उपांत्य फेरीत धडक

मुंबईचे एसएसजी, पार्ले महोत्सवही अंतिम चौघांत

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डीत रंगणार निर्णायक लढती

 

मुंबई, (क्री. प्र.)प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरी पुन्हा एकदा कबड्डीच्या जल्लोषाने दणाणून गेली. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवसापासून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आणि रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने शानदार विजय नोंदवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मुंबई शहरच्या एसएसजी फाऊंडेशन आणि उपनगरच्या पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी यांनीही दमदार खेळ करत अंतिम चौघांत स्थान पक्के केले. आता ब्रम्हा विरुद्ध पार्ले महोत्सव आणि वाघजाई विरुद्ध एसएसजी अशा उपांत्य लढती रंगणार असून या लढतींचे विजेते रात्री उशिरा जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत.

 

ब्रम्हाचा विजय क्लबवर धडाकेबाज विजय

इंडियन ऑइल, एलआयसी, मुथुट फायनान्स आणि सारस्वत बँक यांच्या पुरस्काराने सुरू असलेल्या या स्पर्धेत ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने आपली दणकट ताकद दाखवत विजय क्लबचा अक्षरशः धुव्वा उडवला. प्रफुल झवरे, आकाश शिंदे, स्वयम मालोदे आणि रत्नेश पाटील यांच्या झंझावाती चढाया व भेदक पकडींच्या जोरावर ब्रम्हाने सुरुवातीलाच २९-११ अशी मोठी आघाडी घेतली. सामना पूर्णपणे एकतर्फी झाल्याने विजय क्लबने प्रतिकार सोडून दिला आणि नियोजित वेळेपूर्वीच सामना संपला. अखेर ब्रम्हाने ३८-११ अशा प्रचंड फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.

 


अभिषेक भोजने–अजिंक्य पवार यांच्या झंझावातात गोल्फादेवीचा पराभव

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात वाघजाई क्रीडा मंडळाने दमदार खेळ करत गोल्फादेवी स्पोर्ट्स क्लबचा ४०-१५ असा दणदणीत पराभव केला. अभिषेक भोजने, अजिंक्य पवार, शुभम शिंदे आणि साईराज कुंभार यांच्या झुंजार चढाया व पकडींनी वाघजाईने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. मध्यंतरालाच २१-११ अशी आघाडी घेतल्यानंतर वाघजाईच्या वेगवान खेळापुढे गोल्फादेवीचा संघ पूर्णपणे हतबल दिसला आणि अखेर वाघजाईने सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

 

पंकज मोहितेचा वन-मॅन शो; एसएसजीची दमदार मुसंडी

स्पर्धेतील सर्वात थरारक सामना अंकूर स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन यांच्यात रंगला. सुरुवातीला सुशांत साईल आणि सुरज दाबेकर यांच्या आक्रमक खेळामुळे अंकूरने पहिल्या दहा मिनिटांतच १४-३ अशी जबरदस्त आघाडी घेतली होती. मध्यंतरालाही अंकूर २४-१३ असा आघाडीवर होता. मात्र उत्तरार्धात प्रो कबड्डी सुपरस्टार पंकज मोहितेने अक्षरशः सामन्याचे चित्र पालटले. त्याच्या सुसाट चढायांमुळे एसएसजीने पहिल्या दहा मिनिटांतच ३२-२४ अशी आघाडी घेत सामना आपल्या ताब्यात घेतला. तब्बल ११ गुणांनी पिछाडीवरून मुसंडी मारत एसएसजीने १९ गुणांची भरारी घेत ४२-२९ असा विजय मिळवला. पंकज मोहितेने तब्बल १६ गुणांची कमाई करत वन-मॅन आर्मीप्रमाणे संघाला उपांत्य फेरीत नेले.

 

अक्षय तावडेच्या १४ गुणांनी पार्ले महोत्सवचा विजय

दुसऱ्या लढतीत पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने स्वस्तिक क्रीडा मंडळाचा ३७-२८ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पार्लेकडून अक्षय तावडेने आक्रमक चढायांच्या जोरावर १४ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वस्तिककडून अमित चव्हाण आणि अशोक विटकर यांनी जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पार्ले महोत्सवच्या वेगवान खेळापुढे त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.

 


आता उपांत्य फेरीत रंगणार कबड्डीचा महासंग्राम

स्पर्धेचा रंगतदार टप्पा आता अधिकच रोमांचक होणार आहे. उपांत्य फेरीत ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि वाघजाई क्रीडा मंडळ विरुद्ध एसएसजी फाऊंडेशन अशा दोन दमदार लढती रंगणार आहेत. या लढतींतील विजेते संघ रात्री उशिरा राजाभाऊ देसाई स्मृती चषकाच्या जेतेपदासाठी अंतिम सामन्यात आमनेसामने भिडणार असल्याने कबड्डीप्रेमींना आणखी थरारक आणि रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत.


Post a Comment

0 Comments