Type Here to Get Search Results !

यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि चौगुले स्पोर्ट्स क्लबची दमदार आगेकूच! इन्श्युरन्स शील्ड टी-२० स्पर्धेत तुफानी फलंदाजी व भेदक गोलंदाजी; उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट


 

यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि चौगुले स्पोर्ट्स क्लबची दमदार आगेकूच!

इन्श्युरन्स शील्ड टी-२० स्पर्धेत तुफानी फलंदाजी व भेदक गोलंदाजी; उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट

 

मुंबई : चौकार-षटकारांची आतषबाजी, गोलंदाजांचा अचूक मारा आणि थरारक लढतींनी गाजलेल्या इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेत अनेक संघांनी शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. रूपकुमार यादव आणि जितेश राऊत यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर अनुक्रमे यूनियन बँक आणि चौगुले स्पोर्ट्स क्लब यांनी दिमाखात विजय मिळवला. या दोन्ही संघांसह बँक ऑफ इंडिया आणि डाटामॅटिक्स यांनीही उपांत्य फेरीत मजल मारत स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली.

 

रूपकुमार यादवची तुफानी ९० धावांची खेळी; यूनियन बँकेचा धडाकेबाज विजय

एलिट गटातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात यूनियन बँक संघाने बँक ऑफ महाराष्ट्रवर दणदणीत विजय मिळवला. रूपकुमार यादवच्या आक्रमक ९० धावा आणि फरहान शेखच्या ५७ धावा यांच्या जोरावर यूनियन बँकेने २० षटकांत तब्बल २१५ धावांचा डोंगर उभा केला.

या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बँक ऑफ महाराष्ट्रला २० षटकांत १२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. आर्यन जाधव – ४५ धावा, अमोघ हिरमाथ – ३० धावा या दोघांनी प्रयत्न केले, मात्र धावांचा डोंगर पार करणे अशक्य ठरले.

 

नितीन कडाले आणि आर्या गायकवाडची भेदक गोलंदाजी; बँक ऑफ इंडियाचा विजय

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात बँक ऑफ इंडिया संघाने आयडीबीआयवर ३१ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना वेदांत भावेच्या ४४ धावांच्या चिवट खेळीमुळे बँक ऑफ इंडियाने २० षटकांत १३४ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात आयडीबीआयचा डाव १०३ धावांवर रोखण्यात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. नितीन कडाले – २४ धावांत ४ विकेट्स, आर्या गायकवाड – २१ धावांत ३ बळी यांची कामगिरी प्रभावी ठरली.  

 

जितेश राऊतची ९० धावांची वादळी खेळी; चौगुले स्पोर्ट्स क्लबचा विजय

सेंट्रल बँकेने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य चौगुले स्पोर्ट्स क्लबने शानदार फलंदाजी करत सहज पार केले. या सामन्यात जितेश राऊतने केवळ ४० चेंडूत तुफानी ९० धावा करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. यापूर्वी गौतम साठेने ६१ धावांची खेळी करत सेंट्रल बँकेला स्पर्धात्मक धावसंख्या उभी करून दिली होती; मात्र राऊतच्या आक्रमक फलंदाजीपुढे ती अपुरी ठरली.

 

रोहिदास कोयंडेच्या खेळीने डाटामॅटिक्सचा विजय

चौथ्या सामन्यात न्यू इंडिया इन्श्युरन्स संघाने शौर्या नागर (६१) आणि साळस्कर (४४) यांच्या दमदार खेळीमुळे १४४ धावा केल्या. मात्र डाटामॅटिक्स संघाने संयमी फलंदाजी करत हे लक्ष्य गाठले. रोहिदास कोयंडे – ३७ धावा याच्या खेळीमुळे डाटामॅटिक्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

 

प्लेट गटात सॅटेलाईट ग्रूप आणि युनायटेड पटनी इंडस्ट्रिजची चमक

प्लेट गटातील उपांत्यपूर्व सामन्यात सॅटेलाईट ग्रूपने इंडिया फर्स्ट लाइफ इन्श्युरन्सने दिलेले ७६ धावांचे लक्ष्य १४.४ षटकांत सहज पार केले. मयांक पिल्ले – नाबाद ३५ धावा तसेच गोलंदाजीत मानस चव्हाणने ३ विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांना ७५ धावांवर रोखले.

 

दुसऱ्या सामन्यात अखिलेश यादवने भेदक गोलंदाजी करत १७ धावांत ४ विकेट्स घेत बेस्ट संघाला ९९ धावांत गुंडाळले. त्यानंतर युनायटेड पटनी इंडस्ट्रिजने हे आव्हान १६.५ षटकांत पूर्ण करत विजय साकारला.

 

९ मार्चला उपांत्य फेरीचे सामने

स्पर्धेची उत्कंठा आता अधिक वाढणार असून एलिट आणि प्लेट गटाच्या उपांत्य फेरीचे सामने ९ मार्च रोजी क्रॉस मैदान येथे खेळवण्यात येणार आहेत.


Post a Comment

0 Comments