१५ वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेत एस आय ई एस शाळा अजिंक्य
अंतिम सामन्यात ज्ञानविकास विद्यालय, कोपरखैरणेचा ३२–१९ असा पराभव
कुर्ला येथील गांधी मैदानावर रंगली चुरशीची लढत
महिला दिनानिमित्त शालेय कबड्डीची रंगतदार
मेजवानी
मुंबई : मुंबईत महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या १५ वर्षाखालील
शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एस आय ई एस शाळेने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. गोरखनाथ महिला
संघ यांच्या आयोजनात आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने
कुर्ला येथील गांधी मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अनेक शालेय संघांनी
उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले. अंतिम सामन्यात एस आय ई एस शाळेने ज्ञानविकास विद्यालय, कोपरखैरणेचा ३२–१९ असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
वैदेही गवळीची चमकदार कामगिरी
अंतिम सामन्यात एस आय ई एस शाळेकडून वैदेही गवळी हिने आक्रमक
चढाया आणि चपळ बचावाच्या जोरावर संघाला आघाडी मिळवून दिली. तिच्या अचूक खेळामुळे
एस आय ई एस संघाने सामन्यावर नियंत्रण ठेवले. प्रतिस्पर्धी ज्ञानविकास विद्यालयाकडून वैभवी सिंग हिनेही उत्कृष्ट
खेळ करत संघासाठी झुंज दिली.
उपांत्य फेरीत ज्ञानविकासची सहज सरशी
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ज्ञानविकास हायस्कूल संघाने सेंट जॉन हायस्कूलचा आरामात पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सेंट जॉनकडून कृतिका कदम तर
ज्ञानविकासकडून उन्नती रावडे यांनी उल्लेखनीय खेळ सादर केला.
टाय-ब्रेकरमध्ये एस आय ई एसची बाजी
दुसऱ्या उपांत्य फेरीत एस आय ई एस हायस्कूल आणि कुमुद विद्यालय यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. नियमित
वेळेत सामना ३२–३२ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या ५–५ चढायांच्या
जादा डावात एस आय ई एस संघाने संयम राखत बाजी मारली आणि अंतिम फेरीत
प्रवेश निश्चित केला.
राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान
या स्पर्धेच्या निमित्ताने कबड्डी क्षेत्रातील नामांकित
राष्ट्रीय खेळाडू पुष्पा डावरे, उषा सावंत, श्रद्धा म्हात्रे, सुवर्णा लोखंडे आणि स्वाती पार्थ यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याच मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळाही संपन्न झाला.
मान्यवरांची उपस्थिती आणि खेळाडूंना प्रोत्साहन
प्रमुख पाहुण्या पुष्पा डावरे (NIS,
सेंट्रल रेल्वे
महिला कबड्डी प्रशिक्षक) यांनी सहभागी झालेल्या चारही संघांना रोख पारितोषिक
देऊन प्रोत्साहन दिले. यावेळी दिपक कांदळगावकर, विकास लाड, संतोष देवरुखकर, राष्ट्रीय खेळाडू भारत संघाणे, शशी चव्हाण, नितीन घाग, राजा हुमणे, सुभाष चव्हाण, प्रतिक गाढवे, मनीष मोरे, अतुल चव्हाण, निलेश झंजे, अमित कांबळे, अॅड. विश्वास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी
आयोजन
राष्ट्रीय प्रशिक्षक आणि खेळाडू बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन
करण्यात आले. तसेच अविनाश महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत
स्पर्धा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पाडली. या स्पर्धेमुळे शालेय स्तरावर कबड्डीला
नवे बळ मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments