Type Here to Get Search Results !

विक्रोळीत कबड्डीचा हॉलीवूड क्लायमॅक्स पाच-पाच चढायांच्या थरारात आयएसपीएलचा विजयी डंका बीपीसीएलवर मात करत आमदार चषकावर नाव कोरले! नीरज मिसाळ सर्वोत्तम खेळाडू मिलन दहिया चढाईवीर तर साईप्रसाद पाटील सर्वोत्तम पकडपटू शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे ठोके वाढवणारा महासंग्राम!

 


विक्रोळीत कबड्डीचा हॉलीवूड क्लायमॅक्स

पाच-पाच चढायांच्या थरारात आयएसपीएलचा विजयी डंका

बीपीसीएलवर मात करत आमदार चषकावर नाव कोरले!

नीरज मिसाळ सर्वोत्तम खेळाडू

मिलन दहिया चढाईवीर तर साईप्रसाद पाटील सर्वोत्तम पकडपटू

शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे ठोके वाढवणारा महासंग्राम!

 

मुंबई : विक्रोळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरीत कबड्डीचा असा थरार रंगला की उपस्थित हजारो कबड्डीप्रेमींचे हृदयाचे ठोकेच चुकले! आमदार सुनील राऊत यांच्या भव्य आयोजनातील आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आयएसपीएल (इन्शुअरकोट स्पोर्ट्स) ने बीपीसीएलवर पाच-पाच चढायांच्या क्लायमॅक्समध्ये ९-४ (४६-४१) अशी थरारक मात करत जेतेपद पटकावले. प्रभादेवीतील पराभवाचा बदला घेत आयएसपीएलने एका झटक्यात हिशेब चुकता केला आणि हंगामातील आपले चौथे जेतेपद जिंकले.

 

फायनलचा थरार : १९-३३ पिछाडीतून बीपीसीएलची जोरदार पुनरागमन
पुरुषांच्या व्यावसायिक गटातील अंतिम सामना अक्षरशः सिनेमॅटिक ठरला. आयएसपीएलने संपूर्ण सामन्यावर पकड ठेवत १९-३३ अशी बीपीसीएलला पिछाडीवर ढकलले होते. पराभवाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बीपीसीएलने शेवटच्या पाच मिनिटांत जबरदस्त कमबॅक करत सामना ३७-३७ असा बरोबरीत आणला. या पुनरागमनामागे मिलन दहियाचा वेगवान आणि धडाकेबाज खेळ निर्णायक ठरला.

 


नीरज-राकेशची सुरुवात, किशोर-वैभवची पकड

सामन्याच्या सुरुवातीलाच नीरज मिसाळ आणि राकेश खटकर यांनी सुसाट चढाया करत आयएसपीएलला पहिल्या चार मिनिटांतच १०-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर किशोर जाट आणि वैभव रबाडे यांनी अप्रतिम पकडी करत बीपीसीएलच्या चढाईबहाद्दरांना रोखले आणि आयएसपीएलने सामन्यावर २१-१३ अशी मजबूत पकड घेतली. मध्यंतराला ८ गुणांची आघाडी घेत आयएसपीएलने विजेतेपदाच्या दिशेने घोडदौड सुरू केली.

 

मिलन दहियाचे वादळ : बीपीसीएलचा जीवंत लढा

उत्तरार्धात बीपीसीएलसाठी मिलन दहिया एकहाती लढताना दिसला. त्याच्या वेगवान, अचूक आणि गुणकारी चढायांनी संघाला पुन्हा सामन्यात आणले. शेवटच्या पाच मिनिटांत तो प्रत्येक चढाईत गुण मिळवत आयएसपीएलच्या जवळ पोहोचत होता. दुसरीकडे आयएसपीएलचे खेळाडू बचावात्मक खेळ करत वेळ काढत होते. या घाबरट धोरणामुळे बीपीसीएलने अनपेक्षितपणे सामना बरोबरीत आणला.

 

पाच-पाच चढायांचा क्लायमॅक्स : आयएसपीएलचा बदला पूर्ण

बरोबरीनंतर पाच-पाच चढायांच्या निर्णायक डावात मात्र आयएसपीएलने चुका टाळल्या. त्यांनी जोरदार चढाया करत बीपीसीएलच्या आक्रमणालाही अचूक पकडीत रोखले आणि ९-४ अशा फरकाने अंतिम विजय मिळवत आमदार चषकावर नाव कोरले. हा विजय म्हणजे प्रभादेवीतील पराभवाचा परफेक्ट बदला ठरला.

 

महिलांमध्ये शिवशक्तीचा जलवा

महिला गटात शिवशक्तीने राजमाता जिजाऊचे आव्हान ३२-३० असे मोडीत काढत विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत रंगली, मात्र निर्णायक क्षणी शिवशक्तीने बाजी मारत महिला गटावर आपला झेंडा फडकावला.

 

आयएसपीएलचे चौथे जेतेपद : विजयी मालिकेचा विस्तार

याआधी आयएसपीएलने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या व्यावसायिक स्पर्धेत, अमरावतीच्या तिवसा येथील आमदार चषकात, तसेच वाशिमच्या आमदार चषकात विजेतेपद पटकावले होते. या हॅटट्रिकनंतर ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत बीपीसीएलने त्यांची मालिका खंडित केली होती. मात्र आता आयएसपीएलने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवत आपली ताकद सिद्ध केली.

 

नीरज मिसाळ बाईकवर स्वार : सर्वोत्तम खेळाडूचा मान

अंतिम सामन्यातील झुंजार आणि वेगवान खेळासाठी नीरज मिसाळला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले. आमदार सुनील राऊत यांनी त्याला लाखमोलाची बाईक भेट देत गौरविले. विजेता आयएसपीएलला चषकासह २ लाख रुपये, तर उपविजेता बीपीसीएलला १.५ लाख रुपये देण्यात आले. उपांत्य फेरीत पराभूत संघांना प्रत्येकी ७५ हजार रुपये देण्यात आले.

 

विशेष पुरस्कार : मिलन दहिया चढाईवीर, साईप्रसाद पाटील पकडपटू

बीपीसीएलचा मिलन दहियाला स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईवीर म्हणून गौरवण्यात आले, तर सीजीएसटीचा साईप्रसाद पाटीलने सर्वोत्तम पकडपटूचा मान पटकावला. त्यांच्या कामगिरीने संपूर्ण स्पर्धेला वेगळीच उंची दिली.

 

दिग्गजांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण सोहळा आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे आणि प्रसिद्ध कबड्डी निवेदक राणाप्रताप तिवारी यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.

 

विक्रोळीने पाहिला कबड्डीचा खरा ब्लॉकबस्टर!

चार दिवस चाललेल्या या कबड्डी महोत्सवाचा शेवट एका संस्मरणीय आणि थरारक क्लायमॅक्सने झाला. आयएसपीएलच्या विजयी डंकाराने आणि बीपीसीएलच्या लढाऊ वृत्तीने विक्रोळीतील प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने कबड्डीचा ‘ब्लॉकबस्टर’ अनुभव दिला. आमदार चषक स्पर्धा यंदा केवळ स्पर्धा नव्हती, तर कबड्डीच्या रोमांचाचा एक जिवंत उत्सव ठरली!


Post a Comment

0 Comments