पूर्णतः दृष्टिहीन अजय लालवानीची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ऐतिहासिक मोहिम
जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर ५,३६४ मीटर उंची सर
आता माऊंट एव्हरेस्ट जिंकण्याचे ध्येय
मुंबई : डोळ्यांना अंधार असला तरी
स्वप्नांना आकाशाची मर्यादा नसते, हे आपल्या अदम्य जिद्दीने
सिद्ध करून दाखवले आहे मुंबईच्या पूर्णतः दृष्टिहीन गिर्यारोहक अजय लालवानी यांनी! संघर्ष, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर अजय यांनी जगप्रसिद्ध एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरीत्या सर करत इतिहास
घडवला असून, आता त्यांचे लक्ष्य थेट जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे आहे.
१० दिवसांत एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची किमया
मुंबई महानगरपालिकेच्या वॉटर डिपार्टमेंटमध्ये गेल्या ९ वर्षांपासून सुपरवायझर म्हणून कार्यरत
असलेल्या अजय लालवानी यांनी नुकतीच
एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली. तब्बल ५,३६४ मीटर उंचीवरील हा कठीण ट्रेक
त्यांनी अवघ्या १० दिवसांत पूर्ण करत असामान्य
जिद्दीचे दर्शन घडवले. प्रतिकूल परिस्थिती, कठीण हवामान आणि शारीरिक
आव्हानांवर मात करत त्यांनी ही मोहिम फत्ते केली.
आता लक्ष्य थेट माऊंट एव्हरेस्ट
एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम यशस्वी केल्यानंतर आता अजय यांचे पुढील स्वप्न
म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणे. या ऐतिहासिक मोहिमेसाठी त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र
शासनाकडे आर्थिक मदतीची विनंती केली आहे. “या मोहिमेसाठी
आवश्यक आर्थिक सहाय्य शासन आणि सामाजिक संस्थांकडून मिळाले, तर मी भारत आणि महाराष्ट्रासाठी आणखी मोठी कामगिरी करू शकेन,” अशी भावना अजय लालवानी यांनी व्यक्त
केली.
सायकलिंगमध्येही जागतिक विक्रमांची नोंद
अजय लालवानी हे केवळ
गिर्यारोहक नसून अनेक प्रेरणादायी विक्रमांचे मानकरी आहेत. त्यांनी सायकलिंगमध्ये मुंबई–काश्मीर–कन्याकुमारी–मुंबई असा तब्बल ७,५०० किलोमीटर प्रवास अवघ्या ४५ दिवसांत पूर्ण केला आहे. तसेच काश्मीर ते कन्याकुमारी हा सुमारे ३,८०० किलोमीटरचा प्रवास
त्यांनी केवळ ९ दिवस, १२ तास आणि ४
मिनिटांत पूर्ण करून उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
जूडो, ट्रायथलॉन आणि
मलखांबमध्येही दमदार ठसा
अजय लालवानी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जूडोपटू असून त्यांनी ट्रायथलॉन स्पर्धाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. भारतीय पारंपरिक खेळ मलखांबच्या प्रात्यक्षिकातून
त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचा गौरव वाढवला.
२८५ हून अधिक गड-किल्ल्यांवर मोहिमा
गिर्यारोहणाची आवड जोपासताना अजय लालवानी यांनी महाराष्ट्रातील तब्बल २८५ पेक्षा अधिक
गड-किल्ल्यांवर यशस्वी मोहिमा केल्या आहेत.
तसेच हिमालयातील ४ मोठे ट्रेक पूर्ण करून
त्यांनी साहस क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शिक्षणासोबत जिद्दीचा प्रवास सुरूच
क्रीडा आणि साहस क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अजय लालवानी सध्या कीर्ती महाविद्यालयात पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. शिक्षण, नोकरी आणि साहसी मोहिमा
यांचा समतोल साधत त्यांनी अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेला प्रवास
पूर्णतः दृष्टिहीन असूनही संकटांशी दोन हात करत स्वतःची स्वप्ने पूर्ण करणारे अजय लालवानी आज असंख्य तरुणांसाठी
प्रेरणास्थान बनले आहेत. “मर्यादा शरीरात नसतात, त्या मनात
असतात,” हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून पुन्हा एकदा सिद्ध करून
दाखवले आहे.

Post a Comment
0 Comments