‘आरबीआय खो-खो चषक २०२६’ साठी १२ मातब्बर संघ
सज्ज
परळच्या लाल मैदानावर रंगणार व्यावसायिक खो-खोचा महासंग्राम!
मुंबईत रंगणार वेग, चपळाई आणि रणनीतीचा जल्लोष!
मुंबई : खो-खो प्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढवणारा आणि
मैदानावर विजेच्या वेगाने धावणाऱ्या खेळाडूंचा थरार अनुभवण्याची वेळ आता जवळ आली
आहे! मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
स्पोर्ट्स क्लब आयोजित ‘पहिली व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा २०२६’ परळच्या
ऐतिहासिक विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या लाल मैदानावर रंगणार असून, मुंबईतील व्यावसायिक खो-खोच्या इतिहासात हा
स्पर्धेचा सोहळा विशेष पर्व ठरणार आहे. दि. १४ मे ते १७ मे २०२६ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील दिग्गज
संघ विजेतेपदासाठी जीवाची बाजी लावणार आहेत.
१२ दिग्गज संघांमध्ये रंगणार चुरशीची लढत!
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तब्बल १२ व्यावसायिक संघ सहभागी होत असून प्रत्येक संघ विजेतेपदावर नाव
कोरण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. स्पर्धेची आखणी बाद पद्धतीने करण्यात आली असून
मैदानावर प्रत्येक सामन्यात चुरस, वेग आणि रणनीतीचा अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे. या
स्पर्धेत सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, मुंबई पोलीस, बँक ऑफ इंडिया, महानगरपालिका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नेवल डॉक, महाराष्ट्र पोस्ट, महावितरण, ठाणे विशेष पोलीस सेल, गंधेकर इलेक्ट्रिकल्स आणि रचना नोटरी वर्क्स हे बलाढ्य संघ
सहभागी होणार आहेत.
उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी उत्सुकता शिगेला!
स्पर्धेचे सामने गुरुवारपासून रंगणार असून प्रत्येक दिवस
रोमांचक लढतींनी गाजणार आहे. दि. १६ मे रोजी सायंकाळी ६:३० आणि ७:३० वाजता उपांत्य फेरीचे सामने खेळवले जातील.
त्यानंतर संपूर्ण स्पर्धेचा उत्कर्षबिंदू ठरणारा भव्य अंतिम सामना दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता होणार
आहे. त्याआधी सायंकाळी ६:३० वाजता तिसऱ्या क्रमांकासाठी लढत रंगेल. त्यामुळे
परळच्या लाल मैदानावर चार दिवस अक्षरशः खो-खोचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार शानदार
उद्घाटन
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर
उपस्थित राहणार असून त्यामुळे स्पर्धेची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे. उद्घाटन
प्रसंगी सुमन रे (प्रादेशिक संचालक, मुंबई), राहुल सिन्हा (महाव्यवस्थापक, एचआरएमडी, सेंट्रल ऑफिस), श्री. अविनाश कपूर (महाव्यवस्थापक, एफईडी, एमआरओ) तसेच भारताचे माजी कुस्तीपटू आणि अर्जुन पुरस्कार
विजेते पप्पू यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आयोजन
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई खो-खो संघटनेचे विशेष
मार्गदर्शन लाभत आहे. तसेच आरबीआय स्पोर्ट्स क्लबचे जनरल सेक्रेटरी सचिन
नरसप्पा स्पर्धेच्या नियोजनाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.
त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली आहे.
व्यावसायिक खो-खोला नवे व्यासपीठ!
मुंबईतील खो-खोचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि व्यावसायिक
खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेकडे अत्यंत
महत्त्वाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. वेग, फिटनेस, चपळाई आणि संघभावना यांचा अद्भुत संगम असलेल्या
या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळणार आहे. आता संपूर्ण खो-खो
विश्वाचे लक्ष परळच्या लाल मैदानाकडे लागले असून, ‘आरबीआय चषक’ कोण उंचावणार याची उत्सुकता शिगेला
पोहोचली आहे!

Post a Comment
0 Comments