Type Here to Get Search Results !

निखिल अहिरवालच्या संयमी शतकाने गावस्कर संघ अव्वलस्थानी! लॅव्हिश सिंगच्या झंझावाती अर्धशतकाने तेंडुलकर संघावर मिळवली पहिल्या डावातील आघाडी वेंगसरकर संघाचाही दमदार खेळ कायम

 


निखिल अहिरवालच्या संयमी शतकाने गावस्कर संघ अव्वलस्थानी!

लॅव्हिश सिंगच्या झंझावाती अर्धशतकाने तेंडुलकर संघावर मिळवली पहिल्या डावातील आघाडी

वेंगसरकर संघाचाही दमदार खेळ कायम

 

मुंबई : मुंबईच्या १४ वर्षांखालील संघ निवडीसाठी सुरू असलेल्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत युवा क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. ओव्हल मैदानावर निखिल अहिरवाल याच्या अफलातून संयमी शतकासह अर्विन अंबाती आणि लॅव्हिश सिंग यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर गावस्कर संघाने तेंडुलकर संघावर पहिल्या डावातील आघाडी घेत ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे कर्नाटक सपोर्टींग मैदानावर वेंगसरकर संघाने शास्त्री संघाविरुद्ध आपले वर्चस्व कायम राखत प्रभावी कामगिरी केली.

 

निखिल अहिरवालचे दमदार शतक; लॅव्हिश सिंगचा तडाखेबाज अंदाज

ओव्हल मैदानावरील सामन्यात सुरुवातीला ही लढत अनिर्णित राहणार असे वाटत होते. चहापानापर्यंत गावस्कर संघाची अवस्था २ बाद १३६ अशी सावध होती. मात्र अखेरच्या सत्रात सामना पूर्णपणे रंगला. अर्विन अंबाती याने वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करत ५३ धावांची खेळी केली, पण अमर बीके याने एका षटकात अंबाती आणि कचराज यांना बाद करत तेंडुलकर संघाला पुनरागमनाची आशा दिली.

 

लॅव्हिश सिंगने बदलला सामन्याचा चेहरामोहरा

अशा परिस्थितीत मैदानात उतरलेल्या लॅव्हिश सिंग याने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करत सामना गावस्कर संघाच्या बाजूने झुकवला. त्याने अवघ्या ३७ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५९ धावांची झंझावाती खेळी करत तेंडुलकर संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे गावस्कर संघाने पहिल्या डावातील आघाडी निश्चित केली.

 

निखिलचे संयमित शतक चर्चेत

दुसऱ्या बाजूला निखिल अहिरवाल याने अत्यंत संयमी आणि परिपक्व फलंदाजी करत २५४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने संपूर्ण डावाची जबाबदारी सांभाळत नाबाद ११६ धावा फटकावल्या आणि संघाला मजबूत स्थितीत नेले. तेंडुलकर संघाकडून अमर बीके याने ७७ धावांत ३ बळी घेत चांगली झुंज दिली. गावस्कर संघाने ९० षटकांत ५ बाद २६६ धावा करत पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.

 

अनुज चौधरीचे झुंजार अर्धशतक; वेंगसरकर संघाचे वर्चस्व

कर्नाटक सपोर्टींग, क्रॉस मैदानावरील सामन्यात वेंगसरकर संघाने शास्त्री संघाच्या ७४ धावांच्या आव्हानाला दमदार उत्तर देत २०० धावा उभारल्या. या डावात अनुज चौधरी याने ७४ धावांची जबाबदारीपूर्ण खेळी केली. त्याला समर्थ महाडिक (४०), अर्शियन शेख (२९) आणि अंकित म्हात्रे (२०) यांनी चांगली साथ दिली. शास्त्री संघाकडून असद खान आणि आरुष जाधव यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

 

दिव्यम लोढा-देवेन शर्मा यांची पुन्हा प्रभावी गोलंदाजी

दुसऱ्या डावात शास्त्री संघाने काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. कार्तिक छाजेर याने ५४, अक्षद जोशी याने ३७ आणि किआन प्रजापती याने २४ धावा केल्या. मात्र वेंगसरकर संघाच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावी मारा केला. दिव्यम लोढा याने २९ धावांत ४ बळी घेतले, तर देवेन शर्मा याने ३८ धावांत ३ बळी टिपले. त्यामुळे दिवसअखेर शास्त्री संघाची अवस्था ८ बाद १५६ अशी झाली आणि वेंगसरकर संघाने सामन्यावर मजबूत पकड कायम ठेवली.


Post a Comment

0 Comments