Type Here to Get Search Results !

मंथन शिंदेंचा फिरकीचा जादुई मारा शास्त्री संघाचा ७४ धावांत धुव्वा! वेंगसरकर संघाची दमदार आघाडी तेंडुलकर संघासाठी नील नाईकचे झुंजार ८८, मंथन शिंदेंची पंजा कामगिरी चर्चेत

 


मंथन शिंदेंचा फिरकीचा जादुई मारा

शास्त्री संघाचा ७४ धावांत धुव्वा!

वेंगसरकर संघाची दमदार आघाडी

तेंडुलकर संघासाठी नील नाईकचे झुंजार ८८, मंथन शिंदेंची पंजा कामगिरी चर्चेत

 

मुंबई : मुंबईच्या १४ वर्षांखालील संघ निवडीसाठी सुरू असलेल्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. कर्नाटक सपोर्टींग मैदानावर वेंगसरकर संघाने शास्त्री संघाचा अवघ्या ७४ धावांत खुर्दा उडवत पहिल्याच दिवशी ३२ धावांची भक्कम आघाडी घेतली, तर ओव्हल मैदानावर मंथन शिंदे याने भन्नाट फिरकी मारा करत ५ बळी टिपले आणि तेंडुलकर संघाला २५२ धावांत रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. युवा क्रिकेटपटूंच्या या संघर्षमय लढतींनी मुंबई क्रिकेटच्या भविष्यातील तारे पुन्हा एकदा झळकले.

 

देवेन शर्मा-नयन साळुंखे यांचा भेदक मारा

कर्नाटक सपोर्टींग, क्रॉस मैदान येथे झालेल्या सामन्यात वेंगसरकर संघाने नाणेफेक जिंकून शास्त्री संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी अक्षरशः कहर केला. डावखुरा फिरकीपटू देवेन शर्मा याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत २९ धावांत ४ बळी टिपले, तर लेगस्पिनर नयन साळुंखे याने अवघ्या २ धावांत ४ बळी घेत शास्त्री संघाच्या फलंदाजीचा कणा मोडला. दिव्यम लोढा यानेही ४ धावांत २ बळी घेत प्रभावी साथ दिली. शास्त्री संघाकडून अक्षद जोशी (१८), श्रेयस लाटे (१६), कियान प्रजापती (११) आणि रणवीर सिंग (११) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला आणि संपूर्ण संघ ३४.४ षटकांत ७४ धावांत गारद झाला.

 

समर्थ महाडिकच्या खेळीने वेंगसरकर संघ आघाडीवर

अवघ्या ७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेंगसरकर संघालाही सुरुवातीला काही धक्के बसले, मात्र समर्थ महाडिक याने संयमी फलंदाजी करत दिवसअखेर संघाला मजबूत स्थितीत नेले. तो ३९ धावांवर नाबाद असून त्याने अर्शियन शेख (२९) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर अंकित म्हात्रे (२०) याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी आणखी ३८ धावांची भर घालत संघाला ४ बाद १०६ धावांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे वेंगसरकर संघाने पहिल्याच दिवशी ३२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. शास्त्री संघाकडून असद खान याने २७ धावांत २ बळी मिळवले.

 

नील नाईकचे संयमी अर्धशतक; मंथन शिंदेचा पंजा

ओव्हल मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात तेंडुलकर संघाने सुरुवातीलाच ४ धावांवर पहिली विकेट गमावली, मात्र त्यानंतर नील नाईक आणि नीरज सिंग यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य दिले. नील नाईक याने २०३ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह शानदार ८८ धावा, तर नीरज सिंग याने ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर नीलने रितेश गुप्ता (२८) याच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी उभारली. नीयांश मारू यानेही ३७ धावांचे योगदान दिल्याने तेंडुलकर संघाने ८३.३ षटकांत २५२ धावांपर्यंत मजल मारली.

 

मंथन शिंदेंच्या फिरकीने गावस्कर संघाला दिलासा

तेंडुलकर संघ मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच गावस्कर संघाचा लेगस्पिनर मंथन शिंदे याने फिरकीचे जाळे विणत प्रतिस्पर्ध्यांना रोखले. त्याने प्रभावी मारा करत ७३ धावांत ५ बळी टिपले आणि संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याला लॅव्हिश सिंग याने २७ धावांत २ बळी घेत उत्तम साथ दिली. दिवसअखेर गावस्कर संघाने १ बाद ८ धावा केल्या असून त्यांच्यासमोर अजून २४४ धावांचे आव्हान उभे आहे.

 


Post a Comment

0 Comments