सोलापुरात आजपासून राज्यस्तरीय महिला खो-खो आणि
कबड्डीचा थरार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती
महामंडळातर्फे भव्य आयोजन
तीन दिवस नॉर्थकोट प्रशाला मैदानावर रंगणार
क्रीडा महोत्सव
सोलापूर : महिला क्रीडापटूंच्या दमदार खेळाने सोलापूर शहर
पुन्हा एकदा दणाणून जाणार असून, हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती
महामंडळाच्या वतीने राज्यस्तरीय महिला खो-खो आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या
सहकार्याने २८ ते ३० मे दरम्यान नॉर्थकोट प्रशाला मैदानावर हा भव्य क्रीडा सोहळा
रंगणार आहे. स्पर्धेत राज्यभरातील नामांकित महिला संघ सहभागी होणार असून, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाच्या
खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.
आठ-आठ संघांचा सहभाग; ३०० खेळाडू मैदानात उतरणार
महाराष्ट्र तसेच जिल्हा खो-खो आणि कबड्डी संघटनेच्या
मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत खो-खो आणि कबड्डी या दोन्ही
प्रकारांत प्रत्येकी ८ संघ सहभागी होणार आहेत. दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून सुमारे
३०० खेळाडू सहभागी होणार असल्याने मैदानावर चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात खो-खोचे सामने रंगणार असून, कबड्डीचे सामने सायंकाळच्या सत्रात खेळविण्यात
येणार आहेत.
आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा
स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके आणि
स्मृतीचषक देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम क्रमांकासाठी रु.
५१ हजार, द्वितीय
क्रमांकासाठी रु. ३१ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी रु. १५ हजार अशी बक्षिसांची
घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक स्पर्धेत वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी
करणाऱ्या खेळाडूंना तीन विशेष पारितोषिकेही प्रदान करण्यात येणार आहेत.
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार उद्घाटन सोहळा
या राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन आणि पारितोषिक वितरण
समारंभासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती
ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
क्रीडाप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
महिला खेळाडूंचा सहभाग असणार असल्याने सोलापूरकरांना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद
घेण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि महिला खेळाडूंना
प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर आणि उत्सव अध्यक्ष विकी डोंबाळे यांनी केले.

Post a Comment
0 Comments