Type Here to Get Search Results !

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा २०२६ पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी विरुद्ध श्री समर्थ; महिलांमध्ये सरस्वती कन्या विरुद्ध शिर्सेकर्स महात्मा गांधी, तर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वे-मुंबई पोलीस आमनेसामने

 


मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा २०२६

पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी विरुद्ध श्री समर्थ; महिलांमध्ये सरस्वती कन्या विरुद्ध शिर्सेकर्स महात्मा गांधी, तर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वे-मुंबई पोलीस आमनेसामने

 

मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.) येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये उपांत्य फेरीचे सामने अत्यंत रंगतदार झाले. शिवाजी पार्क परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली. पुरुष, महिला आणि व्यावसायिक गटातील थरारक लढतीनंतर अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर, महिला गटात सरस्वती कन्या संघ आणि शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी, तर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वे आणि मुंबई पोलीस यांच्यात अजिंक्यपदासाठी संघर्ष रंगणार आहे.

 


शिर्सेकर्स महात्मा गांधीची विजयी मुसंडी

पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा १३-१० (मध्यंतर १३-५) असा १ डाव व ३ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रामचंद्र झोरे (२.१०, २.२० मि. संरक्षण), सुजल जयगाडे (३ मि. संरक्षण व १ गुण), धीरज भावे (, १.२० मि. संरक्षण), अनिकेत पोटे (नाबाद १.४० मि. संरक्षण व २ गुण), निहार दुबळे (४ गुण), तसेच अर्जुन आणि वसे अनीवसे (प्रत्येकी ३ गुण) यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पराभूत विद्यार्थी संघाकडून शुभम शिंदे (२.२० मि. संरक्षण), प्रतीक घाणेकर (, १.१० मि. संरक्षण व २ गुण) आणि पवन नाचणकर (१.२० मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले, मात्र ते अपुरे ठरले.

 


श्री समर्थचा सरस्वतीवर दणदणीत विजय

दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा १९-१० (मध्यंतर ९-६) असा ९ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अक्षय खापरे यांनी २.१० मि. संरक्षणासह ७ गुणांची कमाई करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्यांना हितेश आंग्रे (१.४०, २.४० मि. संरक्षण व ३ गुण), सुरज खाके (१.१०, नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण), यश बोरकर (१.४० मि. संरक्षण व १ गुण) आणि वेदांत देसाई (१.५० मि. संरक्षण व २ गुण) यांची भक्कम साथ लाभली. सरस्वतीकडून रोहन टेमकर (२.२०, १.३० मि. संरक्षण), करण गारोळे (१.४०, २.१० मि. संरक्षण व १ गुण), चैतन्य धुळप (२ मि. संरक्षण व २ गुण) आणि विनय परीट (१.२०, १.२० मि. संरक्षण) यांनी कडवी झुंज दिली.

 


जानवी-सेजलच्या जोरावर सरस्वती कन्या अंतिम फेरीत

महिला गटाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सरस्वती कन्या संघाने अ. भि. गोरेगावकर संघाचा ११-८ (मध्यंतर ५-२) असा ३ गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. सेजल यादव (, २.२० मि. संरक्षण व ३ गुण), जानवी लोंढे (नाबाद २.१०, ४.५० मि. संरक्षण व ४ गुण) आणि खुशबू सुतार (२.५०, १.४० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी शानदार खेळ करत विजय निश्चित केला. पराभूत संघाकडून कृतिका वाघमारे (२.४०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), रिया बद्रिके (२.२० मि. संरक्षण), सलोनी पवार (३ मि. संरक्षण) आणि सिया बद्रिके (, १.२० मि. संरक्षण) यांनी झुंजार लढत दिली.

 

शिर्सेकर्स महात्मा गांधी महिलांचीही अंतिम फेरीत धडक

महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने श्री सह्याद्री संघाचा १३-९ (मध्यंतर १३-४) असा १ डाव व ४ गुणांनी पराभव केला. सृष्टी पाष्टे (३.२० मि. संरक्षण), नेहा हळदणकर (नाबाद २.२० मि. संरक्षण), दिव्या गायकवाड (१.२०, १.५० मि. संरक्षण व १ गुण) आणि मिताली बारसकर (४ गुण) यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाने अंतिम फेरी गाठली. श्री सह्याद्रीकडून आर्या भाटकर (१ मि. संरक्षण व ४ गुण), तन्वी थेराडे (२.२० मि. संरक्षण व ३ गुण) आणि लावण्या नाकती (१.२०) यांनी लढाऊ खेळ केला.

 

सेंट्रल रेल्वेचा धडाकेबाज विजय

व्यावसायिक गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीत सेंट्रल रेल्वेने स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा १९-२ (मध्यंतर १९-२) असा १ डाव व १७ गुणांनी धुव्वा उडवला. दिलीप खांडवी (४ मि. संरक्षण), शुभम थोरात (३.१० मि. संरक्षण), आकाश तोगरे (५ गुण), तसेच रामजी कश्यप आणि सौरभ घाडगे (प्रत्येकी ३ गुण) यांनी संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. स्पेशल प्रोटेक्शन युनिटकडून श्रीधर देसाई (१.४०, १ मि. संरक्षण) आणि चेतन बावणे (, १ मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले.

 

मुंबई पोलिसांची अंतिम फेरीत दिमाखदार एन्ट्री

दुसऱ्या व्यावसायिक उपांत्य फेरीत मुंबई पोलीस संघाने महावितरण कंपनीचा १३-४ (मध्यंतर १३-४) असा १ डाव व ९ गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. वेदांत देसाई (२.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रदीप जाधव (२.२० मि. संरक्षण), अक्षय खापरे (२.१० मि. संरक्षण व २ गुण), सोहेल कलावंत (५ गुण) आणि सुजित पावल (१.५० मि. संरक्षण) यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली. पराभूत महावितरणकडून प्रतीक वाईकर (१.४० मि. संरक्षण व २ गुण), संभाजी जाधव (१.५० मि. संरक्षण) आणि विराज कोटमकर (१ मि. संरक्षण) यांनी झुंजार लढत दिली.

 

अंतिम फेरीकडे क्रीडारसिकांचे लक्ष

उपांत्य फेरीतील दमदार कामगिरीनंतर आता सर्वांचे लक्ष अंतिम सामन्यांकडे लागले आहे. पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी विरुद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिर, महिला गटात सरस्वती कन्या विरुद्ध शिर्सेकर्स महात्मा गांधी, तर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वे विरुद्ध मुंबई पोलीस या लढती रंगणार असून मुंबईतील खो-खोप्रेमींना आणखी एका रोमांचकारी दिवसाची उत्सुकता लागली आहे.


Post a Comment

0 Comments