Type Here to Get Search Results !

जय म्हात्रेची हॅटट्रिकची करामत; चर्चगेट केंद्राची अंतिम फेरीकडे दमदार वाटचाल तन्मय महन्सारियाची भेदक गोलंदाजी; ठाणे केंद्रानेही उपांत्य फेरीत मजबूत पकड मिळवली

 


जय म्हात्रेची हॅटट्रिकची करामत;

चर्चगेट केंद्राची अंतिम फेरीकडे दमदार वाटचाल

तन्मय महन्सारियाची भेदक गोलंदाजी; ठाणे केंद्रानेही उपांत्य फेरीत मजबूत पकड मिळवली

 

मुंबई : ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फिरकीपटूंनी अक्षरशः धुमाकूळ घालत सामन्यांवर आपली छाप उमटवली. चर्चगेट केंद्राचा डावखुरा फिरकीपटू जय म्हात्रे याने हॅटट्रिकसह अवघ्या ११ धावांत ६ बळी घेत विरार केंद्राचा डाव १०१ धावांत गुंडाळला आणि चर्चगेट केंद्राला अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तन्मय महन्सारिया याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ठाणे केंद्राने एमसीए अकादमी केंद्रावर वर्चस्व गाजवत सामन्यावर पकड मजबूत केली.

 

जय म्हात्रेचा जादुई मारा; विरार केंद्र १०१ धावांत गारद

माटुंग्यातील डीपीसीसी मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात जय म्हात्रे याने भन्नाट गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी विरार केंद्राच्या फलंदाजांना अक्षरशः गुंग केले. त्याने १३ षटकांत तब्बल ९ षटके निर्धाव टाकत हॅटट्रिकसह ६ बळी मिळवले. त्याच्या अचूक आणि धारदार माऱ्यासमोर विरार केंद्राचा डाव केवळ ३६.४ षटकांत १०१ धावांत संपुष्टात आला. विरारकडून सैफ अली याने ३८ धावांची झुंजार खेळी करत थोडासा प्रतिकार केला, मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

 

चर्चगेट केंद्राची सावध पण प्रभावी फलंदाजी

प्रत्युत्तरादाखल चर्चगेट केंद्राने अत्यंत संयमी आणि प्रभावी फलंदाजी करत पहिल्याच दिवसाअखेर सामन्यावर पकड मजबूत केली. शार्दूल फागरे याने ४९ धावांची उपयुक्त खेळी केली, तर शलोक बोंगू नाबाद ४२ आणि आरूष कोल्हे नाबाद ३२ धावांवर खेळत राहिले. चर्चगेट केंद्राने ३९.४ षटकांत २ बाद १४५ धावा उभारत ४४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेत अंतिम फेरीकडे दमदार पाऊल टाकले.

 

तन्मय महन्सारियाचा भेदक स्पेल; एमसीए अकादमी अडचणीत

माटुंगा जिमखान्यावर रंगलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात तन्मय महन्सारिया याने भन्नाट गोलंदाजी करत एमसीए अकादमी केंद्राचा डाव उध्वस्त केला. त्याने ३३ धावांत ५ बळी टिपत प्रतिस्पर्ध्याचे कंबरडे मोडले. त्याला आर्यन कुमार याने २५ धावांत २ बळी घेत मोलाची साथ दिली. एमसीए अकादमीकडून मोक्शा शहा याने एकहाती झुंज देत नाबाद ६७ धावांची खेळी केली, मात्र इतर फलंदाजांकडून त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे एमसीए अकादमीचा डाव ४९.१ षटकांत १५५ धावांत आटोपला.

 

ठाणे केंद्राची मजबूत सुरुवात; अंतिम फेरीचे संकेत

१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ठाणे केंद्राने दिवसअखेर २६ षटकांत २ बाद ९१ धावा करत सामन्यावर पकड मिळवली. पार्थ राणे याने ३३ धावांचे योगदान दिले, तर निरव भोर्कर ३० धावांवर नाबाद राहिला. अजून ८ विकेट्स शिल्लक असल्यामुळे ठाणे केंद्र अंतिम फेरीच्या दिशेने मजबूत स्थितीत पोहोचले आहे.

 

संक्षिप्त धावफलक

उपांत्य फेरी – १ : विरार केंद्र : ३६.४ षटकांत सर्वबाद १०१, (सैफ अली ३८; जय म्हात्रे ६/११) वि. चर्चगेट केंद्र : ४० षटकांत २ बाद १४५


(
शार्दूल फागरे ४९, शलोक बोंगू नाबाद ४२, आरूष कोल्हे नाबाद ३२)

 

उपांत्य फेरी – २ : एमसीए अकादमी केंद्र : ४९.१ षटकांत सर्वबाद १५५
(
मोक्शा शहा नाबाद ६७; तन्मय महन्सारिया ५/३३, आर्यन कुमार २/२५) वि. ठाणे केंद्र : २६ षटकांत २ बाद ९१


(
पार्थ राणे ३३, निरव भोर्कर नाबाद ३०)


Post a Comment

0 Comments