मुंतजीर सरनौबतचा मुंबई महापौर केसरी गदेवर
दणदणीत कब्जा!
इम्रान मुजावरला अवघ्या दीड मिनिटांत चितपट
३२ व्या मुंबई महापौर केसरी स्पर्धेत
धाराशिवच्या मल्लाचा जलवा
मुंबई : वडाळ्यातील भारतीय क्रीडा मंदिराच्या लाल मातीत
अखेर गदेचा खरा मानकरी ठरला आणि हजारो कुस्तीप्रेमींच्या जल्लोषात धाराशिवच्या
मुंतजीर सरनौबत याने अवघ्या दीड मिनिटांत प्रतिस्पर्धी इम्रान मुजावर याला चितपट करत ३२ व्या मुंबई
महापौर केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा आपल्या नावावर कोरली. बृहन्मुंबई महानगरपालिका
आणि मुंबई शहर तालीम संघ आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मुंताजीरच्या विजयानंतर
संपूर्ण मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल
त्याला ₹१ लाखांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
वस्ताद नामदेव बडरे यांचा विश्वास ठरला खरा
मुंबई महापौर केसरी स्पर्धेची घोषणा होताच माटुंग्यातील
लालबहादूर शास्त्री शाळेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद नामदेव बडरे यांनी मोठ्या
आत्मविश्वासाने आपल्या शिष्य मुंतजीर सरनौबत याची प्रवेशिका भरली होती. “आपला चेला गदा
मारणारच” हा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता आणि मुंताजीरनेही आपल्या वस्तादांचा
शब्द अक्षरशः खरा ठरवला.
राष्ट्रीय विजेत्याचा आक्रमक डाव; इम्रानला चितपट
अंतिम लढतीत मुंतजीर सरनौबत आणि इम्रान मुजावर यांच्यात अटीतटीची कुस्ती होईल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीपासून दोन्ही
मल्लांनी आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. मात्र, यंदाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनी
गटात सुवर्णपदक पटकावलेल्या मुंताजीरने संधी साधत आपल्या खास डावाने इम्रानला चितपट
केले आणि महापौर केसरी किताबावर मोहोर उमटवली.
कुमार केसरीत हर्षवर्धन जाधवचा दबदबा
कुमार केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या हर्षवर्धन जाधव याने ठाण्याच्या जय भोईर याच्यावर १०-४ अशा गुणफरकाने
दणदणीत विजय मिळवला. एकतर्फी ठरलेल्या या लढतीत हर्षवर्धनने दुहेरीपट, बगालडूख आणि भारंदाज यांसारखे प्रभावी डाव टाकत
जय भोईरचा प्रतिकार निष्प्रभ केला.
इतर गटांतील विजेतेही ठरले लक्षवेधी
स्पर्धेतील अन्य अंतिम लढतींमध्ये ६२ किलो गटात जयदीप बडरे याने लकी खरात याच्यावर विजय
मिळवत विजेतेपद पटकावले. तर ७२ किलो गटात यश ढाकणे याने प्रकाश माळी याचा पराभव करत विजेतेपद आपल्या नावावर केले.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
स्पर्धेतील विजेत्या मल्लांचा गौरव मुंबई शहर तालीम संघाचे
अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष विठ्ठल भोसले, शशिकांत देशमुख, सचिव प्रकाश तानवडे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय क्रीडा मंदिरात रंगलेल्या या स्पर्धेने मुंबईतील कुस्ती परंपरेचा अभिमान
पुन्हा एकदा अधोरेखित केला.

Post a Comment
0 Comments