Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची विजयी हॅटट्रिक बदलापूरच्या प्रकाशझोतात रंगणार उपांत्य फेरीचा महासंग्राम; लातूर, कोल्हापूरचाही दमदार डंका

 


छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची विजयी हॅटट्रिक

बदलापूरच्या प्रकाशझोतात रंगणार उपांत्य फेरीचा महासंग्राम;

लातूर, कोल्हापूरचाही दमदार डंका

 

बदलापूर : बदलापूर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ मध्ये तिसऱ्या दिवशीही रोमांच, संघर्ष आणि विजयी जल्लोषाची आतषबाजी पाहायला मिळाली. यजमान मुंबई, बलाढ्य पुणे, गतविजेता नाशिक आणि तडफदार नागपूर संघांनी सलग तीन विजयांची हॅटट्रिक करत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी थरारक अनुभव ठरत आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत राज्यातील अव्वल संघांनी आपल्या खेळातील आक्रमकता, वेग आणि कौशल्याचे दर्शन घडवत विजेतेपदासाठी जोरदार दावेदारी सिद्ध केली आहे.

 

मुंबईच्या मुलींचा दबदबा; नागपूरशी उपांत्य लढत

२१ वर्षांखालील मुलींच्या गटात यजमान मुंबई संघाने सलग तिसरा विजय नोंदवत गटात अव्वल स्थान पटकावले. शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने लातूर विभागाचा २५-१४, २५-११ असा सहज पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान अधिक भक्कम केले. मुंबईच्या अचूक ब्लॉकिंग आणि वेगवान स्मॅशेससमोर लातूरचा बचाव निष्प्रभ ठरला.

 

आता उपांत्य फेरीत मुंबईसमोर नागपूरचे आव्हान उभे राहणार आहे, तर दुसऱ्या उपांत्य लढतीत गतविजेता नाशिक आणि पुणे आमनेसामने भिडणार आहेत. नाशिकनेही सलग तीन सामने जिंकून विजेतेपदाच्या शर्यतीतील आपले स्थान अधोरेखित केले आहे.

 

लातूरची विजयी मुसंडी कायम

२१ वर्षांखालील मुलांच्या गटात गतविजेता लातूर संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. कोल्हापूर आणि संभाजीनगरनंतर अमरावतीलाही पराभूत करत लातूरने गटात अव्वल स्थान मिळवले.

 

अटीतटीच्या सामन्यात लातूरने अमरावतीवर २५-२०, २५-२१ असा विजय मिळवला. लातूरकडून शेहराज शेख, आफताब कुरेशी आणि निर्भय देशमुख यांनी आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड कायम ठेवली. उपांत्य फेरीत लातूरचा सामना नागपूरशी होणार असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

नागपूरने मुंबईचे स्वप्न भंगले

१८ वर्षांखालील मुलांच्या गटात नागपूरने मुंबईला तिसऱ्या सेटपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर नागपूरने अप्रतिम पुनरागमन करत सामना २४-२५, २५-२१, १५-१० असा जिंकला.

 

वत्सल्य किरटकर आणि कृष्णा तडसे यांच्या जबरदस्त स्मॅशेसमुळे नागपूरने विजय खेचून आणत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. या विजयामुळे मुंबईचे उपांत्य फेरीचे स्वप्न धुळीस मिळाले. आता उपांत्य फेरीत नागपूरची गाठ पुणेशी पडणार आहे.

 

पुण्याच्या मुलींचा एकतर्फी जलवा

१८ वर्षांखालील मुलींच्या गटात पुणे संघाने गटात अव्वल स्थान मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. नागपूरविरुद्धच्या सामन्यात पुण्याने २५-११, २५-७ असा एकतर्फी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.

 

पुण्याकडून साक्षी साळुंखे आणि वैष्णवी अडलिंगे यांनी अफलातून खेळ करत नागपूरच्या बचावफळीला सतत भेदले. दुसरीकडे गतविजेता लातूर संघाने पराभवानंतर शानदार पुनरागमन करत तिसरा साखळी सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली. आता पुणे विरुद्ध लातूर ही उपांत्य लढत स्पर्धेतील सर्वात रंगतदार सामना ठरण्याची चिन्हे आहेत.

 

उपांत्य फेरीच्या लढती

२१ वर्षांखालील मुले

१) लातूर विरुद्ध नागपूर

२) मुंबई विरुद्ध कोल्हापूर

 

२१ वर्षांखालील मुली

१)     नाशिक विरुद्ध पुणे

२)     मुंबई विरुद्ध नागपूर

 

१८ वर्षांखालील मुले

१)     लातूर विरुद्ध कोल्हापूर

२)     नागपूर विरुद्ध पुणे

 

१८ वर्षांखालील मुली

१)     पुणे विरुद्ध लातूर

२)     कोल्हापूर विरुद्ध नागपूर

 

अंतिम थरारासाठी बदलापूर सज्ज; तब्बल २३ लाखांची रोख बक्षिसे

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी बदलापूर नगरी सज्ज झाली आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.

 

स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे, आकर्षक करंडक आणि पदके प्रदान करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे साखळी फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक विजयी आणि उपविजयी संघालाही रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याने स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.


Post a Comment

0 Comments