‘ऑफ सिझनमध्ये फिटनेस आणि कौशल्य विकासावर भर
द्या’
माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा युवा
क्रिकेटपटूंना मोलाचा सल्ला
जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूटचे परिवर्तन
कपवर नाव कोरले
वेंगसरकरांच्या उपस्थितीत युवा क्रिकेटपटूंचा
जल्लोष
मुंबई : युवा क्रिकेटपटूंच्या उत्साहाने आणि दमदार खेळाने
माहुल, चेंबूर येथील
वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे मैदान अक्षरशः दणाणून गेले. एच. डी. एफ. सी. बँक
परिवर्तन कप १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जितेंद्र आव्हाड
क्रिकेट इन्स्टिटयूट संघाने शानदार कामगिरी करत आशीर्वाद क्रिकेट क्लब संघावर ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत अजिंक्यपद
पटकावले. यावेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूंना “ऑफ सिझनमध्ये फिटनेस
आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा” असा प्रेरणादायी सल्ला दिला.
आरव गुप्ताच्या भेदक गोलंदाजीने आशीर्वाद सी.सी.
गारद
३५ षटकांच्या अंतिम सामन्यात आशीर्वाद क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली; मात्र आरव गुप्ता याच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर त्यांची
फलंदाजी कोलमडली. ५.३ षटकांत अवघ्या ५ धावांत ४ बळी घेत आरवने प्रतिस्पर्ध्यांच्या डावाचे कंबरडे
मोडले. त्याला अद्वैत चौधरी (१८ धावांत २ बळी), आरव सिंग (९ धावांत २ बळी) आणि पार्थ लाड (१८ धावांत २ बळी) यांनी सुरेख साथ दिली.
आशीर्वाद सी.सी.कडून आराध्य सकपाळ याने २९ धावांची झुंजार खेळी केली, तर मृण्मय पाटील याने १९ धावा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न
केला. प्रणव मडवी १० आणि प्रज्वल किणी नाबाद ११ धावांपर्यंत मजल मारू शकले. अखेर
आशीर्वाद क्रिकेट क्लबचा डाव २८.३ षटकांत ८९ धावांवर आटोपला.
मीत करवाडेच्या संयमी खेळीने जितेंद्र आव्हाड
इन्स्टिटयूट विजेता
विजयासाठीचे ९० धावांचे माफक आव्हान स्वीकारताना जितेंद्र आव्हाड
क्रिकेट इन्स्टिटयूट संघाने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी केली. मीत करवाडे याने संयमी आणि
परिपक्व खेळ करत नाबाद ३१ धावा फटकावल्या. त्याला आरव सिंग (१८) आणि अद्वैत यादव (१४) यांनी चांगली साथ दिली.
आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्यांनी २१.५ षटकांत ४ बाद ९० धावा करत स्पर्धेचे
विजेतेपद आपल्या नावावर केले. अंतिम सामन्यातील भेदक गोलंदाजीबद्दल आरव गुप्ता याला सर्वोत्तम
खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेतील चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा
गौरव
या स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत १८२ धावा करणाऱ्या आराध्य सकपाळ (आशीर्वाद सी.सी.) याला सर्वोत्तम फलंदाज पुरस्कार देण्यात आला. स्पर्श संगारे याने स्पर्धेत १० बळी घेत सर्वोत्तम गोलंदाज पुरस्कार पटकावला. तसेच आरव सिंग याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील
सर्वोत्तम खेळाडू या दुहेरी सन्मानाने गौरविण्यात आले.
सुधीर नाईक यांचा विशेष सत्कार
या सोहळ्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनतर्फे मुंबई महानगरपालिकेचे माजी डेप्युटी
कमिशनर सुधीर नाईक यांचा मुंबई क्रिकेटमधील अतुलनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार
करण्यात आला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पारितोषिके भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि सुधीर नाईक यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक
आशीर्वाद क्रिकेट क्लब – २८.३ षटकांत सर्वबाद ८९ (आराध्य सकपाळ २९, मृण्मय पाटील १९, प्रणव मडवी १०, प्रज्वल किणी नाबाद ११; आरव गुप्ता ५ धावांत ४ बळी, अद्वैत चौधरी १८ धावांत २ बळी, आरव सिंग ९ धावांत २ बळी, पार्थ लाड १८ धावांत २ बळी) पराभूत वि. जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूट – २१.५ षटकांत ४ बाद ९० (मीत करवाडे नाबाद ३१, आरव सिंग १८, अद्वैत यादव १४, आरव गुप्ता १०).
निकाल : जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूट ६
विकेट्सनी विजयी.
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम
खेळाडू : आरव गुप्ता.

Post a Comment
0 Comments