Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुणे, मुंबई, लातूरची दमदार सलामी बदलापूरच्या मैदानावर रंगली थरारक लढतींची मेजवानी पुण्याच्या मुलींची दुहेरी चमक, मुंबई-लातूरचा दणदणीत विजय

 


छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुणे, मुंबई, लातूरची दमदार सलामी

बदलापूरच्या मैदानावर रंगली थरारक लढतींची मेजवानी

पुण्याच्या मुलींची दुहेरी चमक, मुंबई-लातूरचा दणदणीत विजय

 

बदलापूर : बदलापूर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्याच दिवशी पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूरच्या संघांनी शानदार खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेवर आपली छाप उमटवली. विशेषत: पुणे संघाच्या मुला-मुलींनी दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः घाम फोडला, तर मुंबई आणि लातूरच्या संघांनीही एकतर्फी विजय मिळवत विजयी घोडदौड सुरू केली.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत १८ व २१ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात साखळी पद्धतीने सामने खेळवले जात आहेत. कडक उन्हामुळे संध्याकाळी विद्युतप्रकाश झोतात रंगलेल्या सामन्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.

 

पुणे-नाशिक सामन्यात थरार; अनुज जोशीचा दमदार खेळ

१८ वर्षांखालील मुलांच्या गटातील पुणे विरुद्ध नाशिक ही लढत दिवसातील सर्वाधिक रंगतदार ठरली. सुरुवातीपासूनच पुणे संघाने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. कर्णधार अनुज जोशी याने मध्यरेषेवरून जबरदस्त स्मॅशेस मारत गुणांची सरबत्ती केली. त्याला ओम झगडे याची तितकीच भक्कम साथ लाभली, तर स्वानंद राजोपाध्ये याने अचूक पासिंग करत सामन्यावर नियंत्रण ठेवले. नाशिक संघाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुण्याच्या आक्रमक खेळापुढे त्यांची झुंज अपुरी ठरली. पुण्याने हा सामना २५-२०, २५-२१ असा जिंकत गटात अव्वल स्थान पटकावले.

 

मुंबईची विजयी सलामी; नाशिकवर एकतर्फी मात

२१ वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान मुंबई संघाने नाशिकवर २५-१०, २५-१२ असा सहज विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईने प्रतिस्पर्ध्यांवर पकड ठेवली आणि उत्कृष्ट बचाव व अचूक स्मॅशेसच्या जोरावर विजय मिळवला.

 

लातूरची मैदानावर दणक्यात एन्ट्री

या गटातील दुसऱ्या सामन्यात लातूर संघाने कोल्हापूरवर २५-१५, २५-१० अशी मात करत आपली ताकद दाखवून दिली. लातूरच्या खेळाडूंनी नेटजवळील अचूक ब्लॉकिंग आणि वेगवान आक्रमणाच्या जोरावर सामना एकतर्फी केला.

 

१८ वर्षांखालील मुलींच्या गटातही लातूरने आपला दबदबा कायम ठेवत नाशिकचा २५-६, २५-११ असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासून अखेरपर्यंत लातूरच्या मुलींनी सामन्यावर वर्चस्व राखले.

 

पुण्याच्या मुलींची दुहेरी कमाल

पुणे संघाच्या मुलींनी १८ आणि २१ वर्षांखालील दोन्ही गटात चमकदार विजय मिळवत विजेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.

 

२१ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याने लातूरचा २५-११, २५-१६ असा पराभव करत सहज विजय मिळवला. त्यानंतर १८ वर्षांखालील गटात पुण्याने संभाजीनगरवर २५-८, २५-१० अशी एकतर्फी मात करत दिवस गाजवला.

 

खेळाडूंसाठी प्रथमच रिसोर्टमध्ये आलिशान निवासव्यवस्था

या स्पर्धेचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे खेळाडूंसाठी करण्यात आलेली आलिशान निवासव्यवस्था. शासकीय स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडूंना बदलापूरमधील विविध रिसोर्टमध्ये निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेमुळे बदलापूरमधील अनेक रिसोर्ट पूर्णपणे बुक झाले असून खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून या पाहुणचाराचे विशेष कौतुक होत आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर खेळाडूंना आरामदायी आणि दर्जेदार निवासव्यवस्था देण्याचा निर्णय घेण्यात आला.


Post a Comment

0 Comments