बंड्या मारूती कबड्डीत बाद फेरीचा थरार
भारत पेट्रोलियम, युवा पलटन, ओ. एन. जी. सी.सह दिग्गजांची धडक!
अनिल जस्ता २५ गुणांसह हिरो
निसटत्या विजयांनी रंगली साखळी फेरी
बाद फेरीत दिग्गजांची एन्ट्री – महाराष्ट्रासह
देशभरातील संघांचा जलवा!
मुंबई : मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अखिल भारतीय पुरुष
व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत साखळी फेरीतून दिग्गज संघांनी बाद फेरीत दमदार
प्रवेश केला आहे. भारत पेट्रोलियम, युवा पलटन (इनशोअरकोट प्रा. लि.), मुंबई बंदर या महाराष्ट्रातील संघांसह दक्षिण मध्य रेल्वे, ओ. एन. जी. सी., जयपूर पिंक क्लब, भारतीय नौदल या बाहेरील संघांनीही आपला दबदबा सिद्ध करत बाद
फेरी गाठली.
भारत पेट्रोलियमचा थरारक विजय – अनिल जस्ताची २५
गुणांची कमाल
ब गटातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारत पेट्रोलियम ने दक्षिण मध्य रेल्वे ला ५३-५२ असे निसटते पराभूत करत गट विजेतेपद पटकावले.
पूर्वार्धात आक्रमक खेळ करत २ लोण देत ३२-२१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात
रेल्वेने जोरदार पुनरागमन केले, मात्र एका गुणाने विजय पेट्रोलियमच्या बाजूने गेला. अनिल जस्ता याने तब्बल २५ गुण मिळवीत विजयात
सिंहाचा वाटा उचलला, तर योगेश दहिया यांनी ६ पकडी करत साथ दिली. रेल्वेकडून आर्यन लोचन (२२ गुण) आणि आशु सिंग (४ पकडी) यांनी झुंज दिली.
ओ. एन. जी. सी.चा निसटता विजय; तरी युवा पलटन गट विजेता
अ गटातील सामन्यात ओ. एन. जी. सी. ने युवा पलटन वर ३८-३७ असा निसटता विजय मिळवला. मध्यंतराला २३-२१ अशी आघाडी
घेतलेल्या ओ. एन. जी. सी. ने सावध खेळ करत विजय टिकवला. विजय याने १२ गुण, तर अंकित दहिया यांनी ४ पकडी घेत महत्वाची भूमिका बजावली. युवा पलटनकडून किशोर जाट याने १६ गुण घेत अखेरपर्यंत
झुंज दिली. गुणफरकामुळे युवा पलटन गट विजेते, तर ओ. एन. जी. सी. उपविजेते ठरले. सामन्यात
बेशिस्त वर्तनाबद्दल चिंटू आणि संघप्रशिक्षक यांना पंचांनी हिरवे कार्ड
दाखवले.
जयपूर पिंक क्लबची एंट्री; देवांक दलालचा प्रभावी खेळ
ड गटात जयपूर पिंक क्लब ने रेड आर्मी वर विजय मिळवत गट उपविजेते म्हणून बाद फेरी
गाठली. देवांक दलाल याने १३ गुण, तर आयुष कुमार यांनी ४ पकडी घेत विजय सोपा केला. या गटात युनियन बँक आधीच गट विजेता
म्हणून पुढे गेली होती.
भारतीय नौदलचा दबदबा; मुंबई बंदरवर मात
भारतीय नौदल संघाने मुंबई बंदर वर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. पहिल्या
डावात २ लोण आणि दुसऱ्या डावात १ लोण देत त्यांनी सामना आपल्या बाजूने वळवला. हिमांशू याचा अष्टपैलू
खेळ आणि ३ अव्वल पकडी निर्णायक ठरल्या. मुंबई बंदरकडून लोकेश यांनी बचावात
प्रयत्न केले, पण ते अपुरे ठरले.
यु. पी. योद्धाची आगेकूच; तामिळनाडूवर विजय
यु. पी. योद्धा संघाने तामिळनाडू क्लब ला १६-०९ असे पराभूत करत बाद फेरीत आपली जागा निश्चित
केली. त्यांच्या संयमी आणि शिस्तबद्ध खेळामुळे हा विजय सहज झाला.
बाद फेरीतील संघ निश्चित; पुढील लढती रंगणार!
युवा पलटन (इनशोअरकोट प्रा. लि.), ओ. एन. जी. सी., भारत पेट्रोलियम, दक्षिण मध्य रेल्वे, भारतीय नौदल, मुंबई बंदर, युनियन बँक, जयपूर पिंक क्लब, तामिळनाडू स्टेट, यु. पी. योद्धा यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीत जयपूर पिंक क्लब विरुद्ध तामिळनाडू क्लब आणि मुंबई बंदर
विरुद्ध यु. पी. योद्धा असे सामने रंगणार आहेत.
स्पर्धेची रंगत शिगेला; पुढे थरारक लढतींची अपेक्षा!
साखळी फेरीतील निसटते विजय, तुफानी खेळ आणि दिग्गजांची आगेकूच यामुळे
स्पर्धेची रंगत कमालीची वाढली आहे. आता बाद फेरीत प्रत्येक सामना निर्णायक ठरणार
असून, कबड्डीप्रेमींसाठी
हा थरार अधिकच रोमांचक होणार आहे!
.jpeg)

Post a Comment
0 Comments