Type Here to Get Search Results !

धाराशिवची दमदार सलामी; मुंबई उपनगर, सांगली आणि बारामतीचा कबड्डीत जलवा राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धेत रंगल्या चुरशीच्या लढती; रत्नागिरी-पुणे, नाईक-शिवभक्त सामने बरोबरीत

 


धाराशिवची दमदार सलामी

मुंबई उपनगर, सांगली आणि बारामतीचा कबड्डीत जलवा

राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धेत रंगल्या चुरशीच्या लढती

रत्नागिरी-पुणे, नाईक-शिवभक्त सामने बरोबरीत

 

सोलापूर : हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थकोट प्रशाला मैदानावर सुरू असलेल्या राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धेत पहिल्याच दिवशी थरार, चुरस आणि दर्जेदार खेळाचे दर्शन घडले. खो-खोमध्ये धाराशिवच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने विजयी सलामी देत आपला दबदबा सिद्ध केला, तर कबड्डीत मुंबई उपनगरच्या स्वराज्य क्रीडा मंडळाने दमदार विजयाची नोंद केली.

 

राम शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर मैदानावर रंगलेल्या सामन्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.

 

अश्विनी-तन्वीच्या अष्टपैलू खेळीने धाराशिवची विजयी सुरुवात

खो-खोच्या उद्घाटन सामन्यात छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, धाराशिव संघाने सोलापूरच्या अध्यक्षीय संघाचा १५-७ असा एक डाव राखून दणदणीत पराभव केला. धाराशिवच्या अश्विनी शिंदे हिने ३ गुण व ३ मिनिटे संरक्षण, तर तन्वी भोसले हिने ३.५० मिनिटे संरक्षण व २ गुण अशी अष्टपैलू कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. सोलापूरकडून अर्चना व्हनमाने (१.४० मि. संरक्षण) आणि सादिया मुल्ला (१.३० मि. संरक्षण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

 

रत्नागिरी-पुणे लढत बरोबरीत; प्रियांका आणि ऐश्वर्याची चमक

दिवसातील सर्वाधिक रंगतदार सामन्यांपैकी एक ठरलेल्या लढतीत रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स आणि पुण्याच्या राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ यांच्यातील सामना १९-१९ असा बरोबरीत सुटला. मध्यंतरालाही दोन्ही संघ ८-८ अशा बरोबरीत होते. पुण्याच्या प्रियांका इंगळे हिने ३.०० व २.०० मिनिटे संरक्षणासह १० गुण, तर रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंत हिने १.३० व १.५० मिनिटे संरक्षणासह ४ गुण मिळवत अष्टपैलू खेळाचे शानदार प्रदर्शन केले.

 

नाईक आणि शिवभक्त यांच्यातही अटीतटीची बरोबरी

ठाण्याच्या दोन संघांमधील संघर्षही तितकाच रोमांचक ठरला. नाईक संघाने ८-९ अशा पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत शिवभक्त क्रीडा मंडळाला १५-१५ असे बरोबरीत रोखले. नाईक संघाच्या पूजा फरगडे हिने १.१० मिनिटे संरक्षण व ४ गुण, तर शिवभक्तच्या दिव्या गायकवाड हिने १.१० व २.२० मिनिटे संरक्षण अशी उल्लेखनीय कामगिरी केली.

 

अन्य खो-खो सामन्यांतही चुरस

इतर सामन्यांत ज्ञानविकास, ठाणे संघाने राजमाता, पुणे संघावर २२-१८ अशी मात केली. शिवभक्त बदलापूर, ठाणे संघाने राजमाता अहिल्यादेवी, सांगली संघाचा १७-१३, तर अध्यक्षीय संघ, सोलापूर संघाचा २१-१० असा पराभव केला. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, धाराशिव संघाने राजमाता अहिल्यादेवी, सांगली संघावर १३-९ अशी एक डाव राखून मात केली. तसेच आर्यन स्पोर्ट्स, रत्नागिरी संघाने नाईक, ठाणे संघावर १९-१८ असा अवघ्या १ मिनिट राखून निसटता विजय मिळवला.

 

मुंबई उपनगरची कबड्डीत विजयी सलामी

कबड्डीच्या सलामीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या स्वराज्य क्रीडा मंडळाने पुण्याच्या डॉ. पतंगराव कदम संघाचा ४०-२२ असा १८ गुणांनी पराभव करत विजयी प्रारंभ केला. मुंबई उपनगरकडून येसिका पुजारी, प्रतीक्षा तांडेल आणि सानिया इंगळे यांनी उत्कृष्ट खेळ केला. पुण्याकडून सानिका गाडे आणि आर्या लवाडे यांनी चांगला प्रतिकार केला, मात्र तो अपुरा ठरला.

 

प्रोग्रेस सांगलीचा सोलापूरवर २७ गुणांनी दणदणीत विजय

दुसऱ्या सामन्यात प्रोग्रेस कबड्डी संघ, सांगली यांनी सोलापूर महिला संघाचा ५४-२७ असा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. सांगलीकडून अल्ली महाडिक हिने प्रभावी चढाया केल्या, तर सोलापूरच्या कीर्ती माने हिनेही झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. मात्र सांगलीच्या संघटित खेळापुढे सोलापूरचा निभाव लागला नाही.

 

बारामती अकॅडमीचा मुंबई शहरवर एकतर्फी विजय

ब’ गटातील सामन्यात बारामती अकॅडमी संघाने विश्वशांती क्रीडा मंडळ, मुंबई शहर संघावर ४९-१७ अशी तब्बल ३२ गुणांनी मात केली. बारामतीकडून मिनाक्षी घाटगे हिने उत्कृष्ट चढाया तर वैशाली झगडे हिने प्रभावी पकडी करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. मुंबई शहरकडून सुमित्रा कांबळे हिने चढाईत तर रोझनी डिसोजा हिने पकडीत चांगली कामगिरी केली, मात्र संघाला पराभव टाळता आला नाही.

 

स्पर्धेतील पुढील सामने ठरणार अधिक रंगतदार

पहिल्याच दिवशी खो-खो आणि कबड्डी दोन्ही स्पर्धांमध्ये उच्च दर्जाचा खेळ, थरारक बरोबरीचे सामने आणि दणदणीत विजय पाहायला मिळाल्याने स्पर्धेतील पुढील सामने आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे सोलापूरच्या क्रीडारसिकांना दर्जेदार क्रीडा मेजवानी अनुभवायला मिळत आहे.

 


Post a Comment

0 Comments