Type Here to Get Search Results !

५१ व्या वर्षी योगेश परदेशीचा सुवर्ण झंकार! एम.सी.एफ. कॅरम स्पर्धेत माजी विश्वविजेत्याचा दिमाखदार विजय महम्मद घुफ्रानवर मात करत योगेश परदेशीने पटकावले विजेतेपद महिला गटात आकांक्षा कदमची जिद्दी सरशी अनुभवाचा बादशाह पुन्हा अव्वल योगेश परदेशीने सिद्ध केले वय हा फक्त आकडा!

 


५१ व्या वर्षी योगेश परदेशीचा सुवर्ण झंकार! 

एम.सी.एफ. कॅरम स्पर्धेत माजी विश्वविजेत्याचा दिमाखदार विजय

महम्मद घुफ्रानवर मात करत योगेश परदेशीने पटकावले विजेतेपद

महिला गटात आकांक्षा कदमची जिद्दी सरशी

अनुभवाचा बादशाह पुन्हा अव्वल 

योगेश परदेशीने सिद्ध केले वय हा फक्त आकडा!

 

मुंबई : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनतर्फे आणि रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने एम.सी.एफ. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली (पश्चिम) येथे संपन्न झालेल्या ११ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. वयाच्या ५१ व्या वर्षी माजी विश्वविजेता योगेश परदेशी यांनी आपल्या अनुभव, संयम आणि अचूक खेळाच्या बळावर पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावत कॅरमविश्वाला पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. अंतिम सामन्यात त्यांनी मुंबईच्या फॉर्मात असलेल्या आंतरराष्ट्रीय विजेत्या महम्मद घुफ्रान याच्यावर १९-१४, २५-१५ असा सरळ विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले.

 

उपांत्य फेरीतच दिला इशारा; प्रशांत मोरेचा धुव्वा

योगेश परदेशी यांच्या विजेतेपदाची पायाभरणी उपांत्य फेरीतच झाली होती. सध्या उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या मुंबईच्या माजी विश्वविजेत्या प्रशांत मोरे याच्यावर त्यांनी २५-२०, २५-० असा धक्कादायक आणि एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे दुसऱ्या सेटमध्ये प्रशांतला एकही संधी न देता विजय मिळवल्याने संपूर्ण स्पर्धेत खळबळ उडाली होती. अंतिम फेरीतही त्यांनी तोच आत्मविश्वास कायम राखत आपल्या सहकारी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महम्मद घुफ्रान याच्यावर वर्चस्व गाजवले.

 

घुफ्रानची दमदार वाटचाल; संदीप दिवेचा तिसऱ्या क्रमांकावर कब्जा

अंतिम फेरीपूर्वी महम्मद घुफ्रान याने उपांत्य सामन्यात जळगावच्या माजी विश्वविजेत्या संदीप दिवे याला २३-९, २५-२१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात योगेशच्या अनुभवापुढे त्याला झुकावे लागले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात संदीप दिवे याने प्रशांत मोरे याचा १७-९, २५-४ असा धुव्वा उडवत कांस्यपदकावर नाव कोरले.

 

निलांश आणि ओंकारने वेधले लक्ष

या स्पर्धेत मुंबईच्या दोन उदयोन्मुख खेळाडूंनी विशेष छाप सोडली. निलांश चिपळूणकर आणि ओंकार टिळक यांनी उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारत अनुभवी खेळाडूंमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या खेळाने भविष्यातील मोठ्या यशाची चाहूल दिली.

 

महिला गटात आकांक्षा कदमची जिद्दी कमाल

महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीची आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिने जबरदस्त जिद्द आणि चिकाटीचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर हिच्याविरुद्धचा पहिला सेट ती २-२४ असा एकतर्फी गमावून बसली होती. मात्र त्यानंतर आकांक्षाने विलक्षण पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे २१-१५ आणि २१-१५ असे जिंकून सामना आपल्या नावावर केला.

 

उपांत्य फेरीत रंगल्या चुरशीच्या लढती

विजेतेपदाच्या वाटेवर आकांक्षा कदम हिने उपांत्य फेरीत मिताली पाठक हिच्यावर १४-१२, ४-१९, २१-१८ असा निसटता विजय मिळवला होता. दुसरीकडे समृद्धी घाडीगावकर हिलाही अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबईच्या सोनाली कुमारी विरुद्ध १८-२०, २१-६, २४-८ अशी कडवी झुंज द्यावी लागली. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मिताली पाठक हिने सोनाली कुमारी हिच्यावर २५-११, १६-१६ असा सरळ विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.

 

अनुभव आणि मानसिक ताकदीचा विजय

या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे योगेश परदेशी यांचा पुनरागमनाचा अध्याय. आधुनिक आणि वेगवान कॅरममध्ये तरुण खेळाडूंचे वर्चस्व वाढत असताना ५१ वर्षीय योगेश यांनी अनुभव, अचूकता आणि मानसिक स्थैर्य यांच्या बळावर विजेतेपद मिळवणे ही मोठी घटना ठरली. उपांत्य फेरीत प्रशांत मोरे आणि अंतिम फेरीत महम्मद घुफ्रान यांच्यासारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना हरवणे ही त्यांच्या महानतेची साक्ष आहे. महिला गटात आकांक्षा कदम हिने पहिला सेट गमावल्यानंतर केलेले पुनरागमन तिच्या लढाऊ वृत्तीचे प्रतीक ठरले. या स्पर्धेने पुन्हा एकदा सिद्ध केले की कॅरममध्ये केवळ कौशल्य नव्हे, तर संयम, जिद्द आणि मानसिक ताकदही तितकीच महत्त्वाची असते.

 

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. भरत पंड्या, केरळ तापीवाला, जैनीशा संपत, सी.ए. नितीन मजिठीया, राकेश मोदी, हेमल शाह, हेमंत आशर आणि अरुण केदार यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महर्षी देसाई यांनी केले.


Post a Comment

0 Comments