Type Here to Get Search Results !

प्रेरित राऊत-हार्दिक गजमलची घातक गोलंदाजी विरार केंद्राची दणदणीत आगेकूच! चर्चगेट, एमसीए अकॅडमी, कल्याण आणि विरार केंद्र उपांत्य फेरीत तिसऱ्या फेरीत युवा क्रिकेटपटूंच्या दमदार कामगिरीने रंगत शिगेला

 


प्रेरित राऊत-हार्दिक गजमलची घातक गोलंदाजी

विरार केंद्राची दणदणीत आगेकूच!

चर्चगेट, एमसीए अकॅडमी, कल्याण आणि विरार केंद्र उपांत्य फेरीत तिसऱ्या फेरीत युवा क्रिकेटपटूंच्या दमदार कामगिरीने रंगत शिगेला

 

मुंबई : मुंबई क्रिकेटची समृद्ध परंपरा जपणाऱ्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये तिसऱ्या फेरीतील दुसऱ्या दिवसाचे सामने अक्षरशः थरारक ठरले. प्रेरित राऊत आणि हार्दिक गजमल यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विरार केंद्राने बोईसर केंद्रावर डाव आणि १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे चर्चगेट केंद्र, एमसीए अकॅडमी केंद्र आणि कल्याण केंद्र यांनीही शानदार विजय नोंदवत अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. आता १९ व २० मे रोजी माटुंगा येथील रमेश दादकर मैदानावर चर्चगेट विरुद्ध विरार आणि एमसीए अकॅडमी विरुद्ध ठाणे यांच्यात उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.

 

प्रेरित-हार्दिकची घातक गोलंदाजी; विरारची ऐतिहासिक मात

साईनाथ स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या सामन्यात विरार केंद्राने सर्वांगीण खेळ करत बोईसर केंद्रावर वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात प्रेरित राऊत याने अवघ्या १५ धावांत ६ बळी घेत बोईसरचा डाव ११४ धावांत गुंडाळला. त्याला हार्दिक गजमल याने ३ बळी घेत सुरेख साथ दिली. फलंदाजीत आदित्य सिंग याने केवळ ५६ चेंडूत १४ चौकारांसह ९५ धावांची झंझावाती खेळी करत विरारला ३२४ धावांपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा हार्दिक गजमल चमकला. त्याने ६/४६ अशी प्रभावी कामगिरी करत बोईसरचा दुसरा डाव १०३ धावांत संपवला. त्यामुळे विरारने डाव आणि १०६ धावांनी विजय साकारला. प्रेरित राऊत सामनावीर ठरला.

 

चर्चगेट केंद्राची पहिल्या डावावर सरशी

सचिन तेंडुलकर जिमखाना येथे झालेल्या लढतीत चर्चगेट केंद्राने बोरिवली केंद्रावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. बोरिवलीच्या १९६ धावांच्या प्रत्युत्तरात चर्चगेटने आरुष कोल्हे आणि कबीर जगताप यांच्या प्रत्येकी ७२ धावांच्या जोरावर २९७ धावा उभारल्या. निखिल गुरव याने ३५ धावांची उपयुक्त खेळी केली. गोलंदाजीत शौर्य काटकडे आणि तस्मय परब यांनी प्रत्येकी ३ बळी घेत झुंज दिली. दुसऱ्या डावात बोरिवलीला ५ बाद ८२ धावाच करता आल्या. निखिल गुरव सामनावीर ठरला.

 

कालिना केंद्राचा दमदार डाव; श्रेयस खिलारे चमकला

एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबवर कालिना केंद्राने कांदिवली केंद्रावर पहिल्या डावाच्या जोरावर विजय मिळवला. कालिनाने पहिल्या डावात सत्यम यादव ९६, श्रेयस खिलारे ९५, जियान काळे ६१ आणि निर्वाण शाह ४९ यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ६ बाद ३२८ धावा घोषित केल्या. प्रत्युत्तरात कांदिवलीचा डाव १०९ धावांत आटोपला. प्रियांश दाणी, अर्णव भुजबळ आणि आवेश खिलारे यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात कांदिवलीने ३ बाद ११२ धावा केल्या. शानदार फलंदाजीसाठी श्रेयस खिलारे सामनावीर ठरला.

 

राजवीर लाडच्या माऱ्याने एमसीए अकॅडमीची आगेकूच

वाशी येथे झालेल्या सामन्यात एमसीए अकॅडमी केंद्राने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय नोंदवला. वाशी केंद्राचा पहिला डाव १३१ धावांत संपवताना राजवीर लाड याने ५ बळी घेतले. त्यानंतर देवाशीष घोडके याच्या ७६ धावांच्या खेळीमुळे एमसीए अकॅडमीने १७८ धावा केल्या. दुसऱ्या डावात वाशीने ९ बाद २१२ धावा घोषित केल्या. समीक्ष नायर ४७ आणि आयुष वरंकर ४४ यांनी प्रतिकार केला, तर अद्वै चौधरी आणि राजवीर लाड यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. अखेरीस एमसीए अकॅडमीने १ बाद ३३ धावा करत सामना आपल्या नावावर केला. राजवीर लाड सामनावीर ठरला.

 

अद्वित तिवारीचा ऑलराउंड शो; घाटकोपरची बाजी

चेंबूरच्या आरसीएफ स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या सामन्यात घाटकोपर केंद्राने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. पहिल्या डावात अद्वित तिवारी आणि शौर्य नवले यांनी प्रत्येकी ४ बळी घेत माटुंग्याला १३२ धावांत रोखले. त्यानंतर घाटकोपरकडून अद्वित तिवारीनेच ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या डावात माटुंग्याच्या शुभम जायसवाल ७५, हृदान ठक्कर नाबाद ६३ आणि अयान्श चिटकारा ४७ यांनी प्रतिकार केला, मात्र पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली नाही. ऑलराउंड कामगिरीसाठी अद्वित तिवारी सामनावीर ठरला.

 

कल्याण केंद्राचा रोमांचक विजय

डीपीझेड सीसी मैदानावर कमी धावांच्या सामन्यात कल्याण केंद्राने ठाणे केंद्रावर विजय मिळवला. पहिल्या डावात दर्शन राठोड याने ६/३९ अशी अफलातून गोलंदाजी करत ठाण्याचा डाव १७० धावांत गुंडाळला. सृजन बोर्से यानेही ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात कल्याणने ५६ बिनबाद धावा करत डाव घोषित केला. ठाण्याच्या दुसऱ्या डावात निरव भोरकर याने नाबाद ५५ धावांची झुंजार खेळी केली, मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या लढाऊ खेळीसाठी तो सामनावीर ठरला.

 

डोंबिवलीचा विजय; अर्णव निकळजेची अष्टपैलू कामगिरी

माटुंगा जिमखान्यावर झालेल्या सामन्यात डोंबिवली केंद्राने बदलापूर केंद्रावर विजय मिळवला. बदलापूरच्या पहिल्या डावात अर्णव निकळजे ६५ आणि आयुष कचवे ३२ यांनी चांगली फलंदाजी केली. गोलंदाजीत अर्णव संत आणि स्वरूप आंब्रे चमकले. दुसऱ्या डावात बदलापूरचा संघ ९८ धावांत बाद झाला. डोंबिवलीने ७ षटकांत २ बाद ७८ धावा करत विजय साकारला. शानदार अष्टपैलू कामगिरीसाठी अर्णव निकळजे सामनावीर ठरला.

 

मीरा रोड केंद्राची पहिल्या डावावर सरशी

अवर्स क्रिकेट क्लब, विरार येथे झालेल्या सामन्यात मीरा रोड केंद्राने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. पहिल्या डावात हृदान बांभणीया ७९ आणि स्मित केरकर ३२ यांच्या जोरावर त्यांनी १८० धावा केल्या. दुसऱ्या डावात विवेक स्वेन ६२, आकाश त्रिपाठी ६१ आणि लॉसन सेरेजो ४४ यांच्या फलंदाजीने ८ बाद २२९ धावा घोषित केल्या. गोलंदाजीत अभिरूप पाटील याने ५/४९ अशी चमकदार कामगिरी केली. पालघरकडून लाभ सांबरे ६१ आणि रित्विक घरत नाबाद ४९ यांनी झुंज दिली. ह्रीधान बांभणीया सामनावीर ठरला.


Post a Comment

0 Comments