Type Here to Get Search Results !

महापौर चषकावर प्रशांत – सोनालीची मोहोर! माटुंग्यात दिग्गजांचा जल्लोष प्रशांत मोरेचा अनुभव पुन्हा ठरला निर्णायक सोनाली कुमारीचा एकतर्फी दबदबा माटुंग्यात कॅरमचा महासंग्राम; प्रशांत आणि सोनाली ठरले बादशाह

 


महापौर चषकावर प्रशांत – सोनालीची मोहोर! माटुंग्यात दिग्गजांचा जल्लोष
प्रशांत मोरेचा अनुभव पुन्हा ठरला निर्णायक

सोनाली कुमारीचा एकतर्फी दबदबा

माटुंग्यात कॅरमचा महासंग्राम; प्रशांत आणि सोनाली ठरले बादशाह

 

मुंबई : लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, माटुंगा येथे रंगलेल्या २३ व्या मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत अनुभवी आणि आक्रमक खेळाची सरशी पाहायला मिळाली. पुरुष गटात माजी विश्वविजेता प्रशांत मोरे याने पुन्हा एकदा आपल्या अचूक स्ट्रोक्स आणि अफाट अनुभवाच्या जोरावर विजेतेपद पटकावत वर्चस्व सिद्ध केले, तर महिला गटात सोनाली कुमारी हिने प्रतिस्पर्धींना अक्षरशः नामोहरम करत महापौर चषकावर कब्जा केला. अंतिम सामन्यांमध्ये दोन्ही विजेत्यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना फारशी संधीच दिली नाही.

 

प्रशांत मोरेचा अनुभव ठरला राहुल सोलंकीवर भारी

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेचा माजी विश्वविजेता प्रशांत मोरे आणि शिवतारा कॅरम क्लबचा राहुल सोलंकी यांच्यात जोरदार लढत रंगली. पहिल्या सेटमध्ये राहुलने चांगली झुंज दिली, मात्र निर्णायक क्षणी प्रशांतने अनुभवाच्या जोरावर महत्त्वाचे गुण घेत २४-२० असा सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये प्रशांतने अक्षरशः वर्चस्व गाजवत राहुलला बचावात्मक खेळावर ढकलले आणि २५-९ अशा दणदणीत विजयासह सरळ दोन सेटमध्ये सामना खिशात घातला.

 

उपांत्य फेरीतही प्रशांतचा अचूक खेळ

अंतिम फेरीपूर्वी उपांत्य सामन्यात प्रशांत मोरे याने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धरिया याचा २१-१४, २५-१३ असा पराभव करत सहज अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे राहुल सोलंकी याने अव्वल मानांकित सिद्धांत वाडवलकर याच्यावर २२-९, २-२१, २५-९ अशी थरारक मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. राहुलचा आक्रमक खेळ लक्षवेधी ठरला, मात्र अंतिम फेरीत प्रशांतच्या अनुभवापुढे त्याला हार मानावी लागली.

 

महिला गटात सोनाली कुमारीचा एकहाती दबदबा

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ए. के. फाउंडेशनच्या सोनाली कुमारी हिने जैन इरिगेशनच्या मिताली पाठक हिच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटमध्ये सोनालीने प्रतिस्पर्धीला एकही संधी न देता तब्बल २५-० असा धक्कादायक विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये मितालीने थोडा प्रतिकार केला, मात्र सोनालीने आक्रमक आणि अचूक खेळ कायम ठेवत २२-११ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

 

महिलांच्या उपांत्य फेरीत रंगल्या चुरशीच्या लढती

अंतिम फेरीत प्रवेश करताना सोनाली कुमारी हिने ऐशा साजिद खान हिचा २४-१३, २५-० असा सहज पराभव केला होता. दुसरीकडे मिताली पाठक हिने सिमरन शिंदे हिच्याविरुद्ध तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात २१-७, १२-२५, २५-२ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

 


अनुभव, संयम आणि आक्रमकतेची सरशी

या स्पर्धेतील अंतिम सामने पाहता एक गोष्ट स्पष्ट झाली — मोठ्या सामन्यांमध्ये अनुभव आणि मानसिक स्थैर्य किती महत्त्वाचे असते हे प्रशांत मोरे यांनी पुन्हा सिद्ध केले. पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पर्धीचा अभ्यास करून नंतर खेळाची दिशा पूर्णपणे बदलण्याची कला प्रशांतकडे आजही तितकीच प्रभावी आहे. दुसरीकडे सोनाली कुमारी हिने महिला गटात ज्या प्रकारे एकतर्फी वर्चस्व गाजवले, ते तिच्या उत्कृष्ट फॉर्मचे द्योतक ठरले. तिच्या अचूक कट्स, जलद फिनिशिंग आणि बचावात्मक नियंत्रणामुळे प्रतिस्पर्धींना पुनरागमनाची संधीच मिळाली नाही.

 


मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ बॅडमिंटनपटू मनोहर गोडसे, लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष नविन जोशी, कार्याध्यक्ष सुहास बेडेकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार संजय देसाई तसेच आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत यांच्या हस्ते मुंबई महापौर चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

 

 


Post a Comment

0 Comments