Type Here to Get Search Results !

“मोठी स्वप्नं पाहा… फक्त खेळू नका, वर्चस्व गाजवा!” - अमोल मुझुमदार एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युवा खेळाडूंना दिला प्रेरणेचा मंत्र; चर्चगेट सेंटरची विजेतेपदाकडे दमदार वाटचाल

 


मोठी स्वप्नं पाहा… फक्त खेळू नका, वर्चस्व गाजवा!” - अमोल मुझुमदार

एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युवा खेळाडूंना दिला प्रेरणेचा मंत्र; चर्चगेट सेंटरची विजेतेपदाकडे दमदार वाटचाल

 

मुंबई : “फक्त ३०-४० धावा करून समाधानी राहू नका, दम असेल तर द्विशतक झळकवा… दोन-तीन विकेट्स घेऊन थांबू नका, सात-आठ विकेट्स घेण्याची जिद्द ठेवा!” अशा शब्दांत भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी युवा क्रिकेटपटूंना मोठी स्वप्नं पाहण्याचा आणि मैदानावर वर्चस्व गाजवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. ३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंशी संवाद साधताना क्रिकेटमधील उच्च दर्जा, मेहनत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

स्वतःचे निकष उंच ठेवा” - मुझुमदारांचा प्रेरणादायी संदेश

अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीचा मान एमसीएचे संयुक्त सचिव निलेश भोसले यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर बोलताना अमोल मुझुमदार म्हणाले, “मोठी स्वप्नं पाहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मैदानावर स्वतःचे उच्च निकष ठेवा. गर्दीतून वेगळे दिसायचे असेल तर मोठ्या कामगिरीची भूक कायम ठेवा.” याच मैदानावर आपण क्रिकेटचे धडे घेतले, वाढलो आणि स्वप्नं पाहिली, अशी भावनिक आठवण सांगताना त्यांनी मुंबई क्रिकेटची समृद्ध परंपरा जपण्याचे आवाहन केले.

 


या स्पर्धेतून नवे रोहित शर्मा घडतील”

स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवे रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल घडतील, असा विश्वास व्यक्त करताना मुझुमदार यांनी पालकांनाही मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. “स्पोर्ट्स मुलांना आयुष्यात वेगळं घडवतं. खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते,” असे ते म्हणाले.

 

जय म्हात्रे आणि निखिल गुरव यांचा घातक मारा

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ठाणे सेंटरचा डाव अवघ्या ३५.१ षटकांत १३८ धावांत आटोपला. चर्चगेट सेंटरच्या फिरकीपटूंनी अचूक मारा करत ठाण्याच्या फलंदाजांना मोठी खेळी उभारू दिली नाही. जय म्हात्रे याने १६ धावांत ३ बळी घेत पुन्हा एकदा आपली प्रभावी गोलंदाजी सिद्ध केली, तर निखिल गुरव यानेही २७ धावांत ३ बळी घेत मोलाची साथ दिली. ठाणे सेंटरकडून पार्थ राणे याने ४६ आणि अथर्व गावडे याने ३० धावांचे योगदान दिले.

 

शार्दूल फागरेच्या अर्धशतकाने चर्चगेटची मजबूत पकड

१३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चर्चगेट सेंटरने सावध पण आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी केली. शार्दूल फागरे याने ६८ धावांची दमदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले, तर आरुष कोल्हे ३४ धावांवर नाबाद राहिला. दिवसअखेर चर्चगेट सेंटरने ४० षटकांत ३ बाद १२४ धावा केल्या असून विजयासाठी त्यांना केवळ १५ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे अंतिम सामन्यावर चर्चगेट सेंटरने मजबूत पकड मिळवली आहे.

 

दिवस १ अखेर संक्षिप्त धावफलक

ठाणे सेंटर : ३५.१ षटकांत सर्वबाद १३८ (पार्थ राणे ४६, अथर्व गावडे ३०; जय म्हात्रे ३/१६, निखिल गुरव ३/२७) वि. चर्चगेट सेंटर : ४० षटकांत ३ बाद १२४ (शार्दूल फागरे ६८, आरुष कोल्हे ३४*)

 


Post a Comment

0 Comments