Type Here to Get Search Results !

परिवर्तन चषक निवड चाचणीत शतकांचा धडाका! अद्वैत कचराज आणि आरव यादव यांच्या नाबाद शतकांनी गावस्कर व तेंडुलकर संघाची दमदार आघाडी दुसऱ्या दिवसावर फलंदाजांचे संपूर्ण वर्चस्व निवड चाचणीत युवा खेळाडूंची तुफानी फटकेबाजी

 


परिवर्तन चषक निवड चाचणीत शतकांचा धडाका!

अद्वैत कचराज आणि आरव यादव यांच्या नाबाद शतकांनी गावस्कर व तेंडुलकर संघाची दमदार आघाडी

दुसऱ्या दिवसावर फलंदाजांचे संपूर्ण वर्चस्व

निवड चाचणीत युवा खेळाडूंची तुफानी फटकेबाजी

 

मुंबई, १५ मे : एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक १४ वर्षांखालील निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी युवा फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडत मैदान गाजवले. ओव्हल मैदानावर अद्वैत कचराज याने संयमी पण भक्कम नाबाद शतक झळकावत गावस्कर संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली, तर क्रॉस मैदानावरील कर्नाटक स्पोर्टिंग मैदानात तेंडुलकर संघाचा कर्णधार आरव यादव याने धडाकेबाज नाबाद १७८ धावांची खेळी करत प्रतिस्पर्धी शास्त्री संघावर दबदबा निर्माण केला. दोन्ही युवा फलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे निवड चाचणी स्पर्धेला रंगतदार व रोमांचक वळण मिळाले आहे.

 

आरव यादवची १७८ धावांची धडाकेबाज खेळी

कर्नाटक स्पोर्टिंग मैदानावर शास्त्री संघाच्या २५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तेंडुलकर संघाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात २ बाद ९२ धावांपासून केली. त्यानंतर नीयांश मारू आणि कर्णधार आरव यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १५२ धावांची भक्कम भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. नीयांश मारू याने ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर आरव यादव याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ साधत १५८ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १७८ धावा फटकावल्या. त्यानंतर नीरज सिंग याच्या २५ धावांच्या साथीने चौथ्या विकेटसाठी आणखी ९१ धावांची भागीदारी झाली. तेंडुलकर संघाने ५ बाद ३३२ धावांवर डाव घोषित करून पहिल्या डावातील आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात त्यांनी शास्त्री संघाचे ४ बाद ११३ धावा करत सामन्यावर पकड मजबूत केली.

 

अद्वैत कचराजचे संयमी शतक गावस्कर संघासाठी निर्णायक

ओव्हल मैदानावरील सामन्यात वेंगसरकर संघाच्या १९१ धावांच्या प्रत्युत्तरात गावस्कर संघाने दमदार फलंदाजी करत ७ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारली. या डावात अद्वैत कचराज आणि लविष सिंग यांनी चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची शानदार भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. लविष सिंग याने ७२ धावांची आकर्षक खेळी केली. त्यानंतर रितेश शॉ याच्या ५० धावांच्या साथीने अद्वैतने सहाव्या विकेटसाठी आणखी ८८ धावांची महत्त्वपूर्ण भर घातली. अद्वैत कचराज याने २५१ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद १०० धावा करत संघाला पहिल्या डावातील आघाडी मिळवून दिली.

 

नीरज पनवरची फिरकी पुन्हा प्रभावी

दुसऱ्या डावात वेंगसरकर संघाची सुरुवात डळमळीत झाली. डावखुरा फिरकीपटू नीरज पनवर याने पुन्हा एकदा अचूक गोलंदाजी करत अवघ्या १३ धावांत ३ बळी घेत वेंगसरकर संघाला ४ बाद ७९ धावांवर रोखले. त्याच्या भेदक माऱ्यामुळे गावस्कर संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली.

 

संक्षिप्त धावफलक

ओव्हल मैदान

वेंगसरकर संघ - ४९.३ षटकांत सर्वबाद १९१ आणि ३२ षटकांत ४ बाद ७९ (स्वस्तिक मालवणकर ३१; नीरज पनवर १३ धावांत ३ बळी) वि. गावस्कर संघ - ९१.१ षटकांत ७ बाद २७५ डाव घोषित (निखिल अहिरवाल २७, अद्वैत कचराज नाबाद १००, लविष सिंग ७२, रितेश शॉ ५०; विहान वाडे ४५ धावांत ३ बळी, नयन साळुंखे ७७ धावांत २ बळी)

 

कर्नाटक स्पोर्टिंग मैदान, क्रॉस मैदान

शास्त्री संघ - ५६.४ षटकांत सर्वबाद २५१ आणि ४ बाद ११३ (अर्णव शेलार ४०, कार्तिक छाजेर नाबाद ३३, अक्षद जोशी नाबाद २२; अमर बी.के. ४४ धावांत ३ बळी) वि. तेंडुलकर संघ - ७९ षटकांत ५ बाद ३३२ डाव घोषित (नीयांश मारू ८०, आरव यादव नाबाद १७८; नक्ष दर्जी ३२ धावांत २ बळी).


Post a Comment

0 Comments