किशोर-किशोरी खो-खोचा जल्लोष! मुंबई जिल्हा अजिंक्यपद
स्पर्धेला दमदार सुरुवात!!
ओम समर्थ, ओम साईश्वर, विद्यार्थी क्रीडा केंद्र व सरस्वती स्पोर्ट्स क्लबची विजयी
सलामी
मैदानावर चपळता, जिद्द आणि थराराचा संगम!
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगला थरार
मुंबई : मुंबईत ॐ समर्थ भारत व्यायाम
मंदिरच्या मैदानावर सुरू झालेल्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा
अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२६-२७ ने पहिल्याच दिवशी थरार, वेग आणि उत्कंठेची पराकाष्ठा गाठली! महाराष्ट्र अॅमॅच्युअर
स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या
स्पर्धेत दोन्ही गटात १०-१० संघ उतरले असून अजिंक्यपदासाठी जोरदार चुरस पाहायला
मिळत आहे. स्पर्धेचे उद्घाटन
उन्मेश नरवणे - अध्यक्ष - ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, दिलीप साठे -
सेक्रेटरी ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, संजय पारेख – विश्वस्त - ॐ समर्थ
भारत व्यायाम मंदिर, भावेश पारिख – खजिनदार-ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, प्रकाश
नकाशे - सेक्रेटरी-महाराष्ट्र अम्युचर स्पोर्ट्स असोसिएशन, नितीन पाष्टे
– प्रशिक्षक - ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी मुंबई खो-खो संघटनेचे
प्र.कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, विकास पाटील यांच्यासह
पदाधिकारी, खो-खो प्रेमी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
किशोरी गट: ओम
समर्थची एकतर्फी दणदणीत सलामी
या सामन्यात नाणेफेक ओम समर्थ भा. व्या. मंदिरने जिंकून संरक्षण
स्वीकारले, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत ओम समर्थने अमर हिंद मंडळाचा १८-७ (मध्यंतर १८-१) असा एक
डाव राखून ११ गुणांनी धुव्वा उडवला. ओम समर्थकडून श्रेया तामणकर (नाबाद ४.३० मि. संरक्षण व ७ गुण), मैत्री नलावडे (२.३० मि. संरक्षण), स्वरा वांगडे (५ गुण), अनन्य राजे (२ गुण) यांनी सलग
कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. अमर हिंदकडून वृषाली मोरे (१.२० मि. संरक्षण व २ गुण), ईश्वरी शिंदे (२ गुण) यांनी प्रयत्न
केले, मात्र ते अपुरे ठरले.
किशोर गट: ओम
साईश्वरचा भक्कम विजय
या लढतीत नाणेफेक ओम साईश्वर सेवा मंडळने जिंकून आक्रमण निवडले, आणि ११-६ असा एक डाव राखून ५ गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून श्रातिक गामी (५ मि. संरक्षण २ गुण), आरव साटम (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), अधिराज गुरव (२ मि. संरक्षण ४ गुण), चिन्मय तांबे (२ मि. संरक्षण) यांनी दमदार खेळ
केला. पराभूत संघाकडून सार्थ वायंगणकर (२ मि. संरक्षण
व १ गुण), कृषल वाघधरे (१.५० मि. संरक्षण
व ४ गुण) यांनी झुंजार लढत दिली.
रोमहर्षक सामना:
ओम समर्थचा एक गुणाने विजय
या सामन्यात नाणेफेक वैभव स्पोर्ट्स क्लबने जिंकून संरक्षण निवडले, पण ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने ४-३ (मध्यंतर १-२) असा एक
गुणाने थरारक विजय मिळवला. निहाल शिंदे (२.३०, ४.४० मि. संरक्षण व १ गुण), रुद्र सिंग चव्हाण (नाबाद ३.५० मि. संरक्षण), ईशान देसाई (२.२० मि. संरक्षण) यांनी निर्णायक
भूमिका बजावली. वैभवकडून शुभम माळी (५.१०, १.३० मि. संरक्षण व १ गुण), यश जाधव (३.३० मि. संरक्षण व २ गुण), अनिकेत गुप्ता (१.५०, १.५० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत
दिली.
विद्यार्थी
क्रीडा केंद्रचा नियंत्रित विजय
या सामन्यात नाणेफेक विद्यार्थी क्रीडा केंद्रने जिंकून संरक्षण
स्वीकारले, आणि ६-४ असा साडेपाच मिनिटे राखून २ गुणांनी विजय मिळवला. विघ्नेश जाधव (२.३०, नाबाद ४ मि. संरक्षण व २ गुण), कार्तिक तोरस्कर (३ मि. संरक्षण), आर्यन परवाडी (२.५० मि. संरक्षण व १ गुण), अंशुमन भिडे (१.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी संघाला विजय मिळवून दिला. अमर हिंदकडून वेदांत हडशी (५.३०, नाबाद १.१० मि. संरक्षण), जीवन उपाध्याय (१.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी चांगली झुंज दिली.
सरस्वती
स्पोर्ट्स क्लबचा दमदार शेवट
या सामन्यात नाणेफेक सरस्वती स्पोर्ट्स क्लबने जिंकून आक्रमण निवडले, आणि १६-१० असा ६ गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून यतीन, शिवम झा, अनिकेत सोनार, भाविक घाग यांनी प्रभावी
खेळ केला, तर सरस्वती मंदिर हायस्कूलकडून अलीम, ऋषभ नाडकर यांनी चांगला
प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी
खेळाडूंच्या चपळतेने, जिद्दीने आणि थरारक खेळीने
प्रेक्षकांची मने जिंकली असून पुढील सामन्यांमध्ये अजून अधिक रंगत वाढणार हे
निश्चित!






Post a Comment
0 Comments