Type Here to Get Search Results !

खो-खोत धाराशिवला तर कबड्डीत मुंबई उपनगरचा विजेतेपदावर दिमाखदार कब्जा राज्य निमंत्रित महिला स्पर्धेचा रंगतदार समारोप अश्विनी शिंदे आणि याशिका पुजारी ठरल्या स्पर्धेच्या नायिका

 


खो-खोत धाराशिवला तर कबड्डीत मुंबई उपनगरचा विजेतेपदावर दिमाखदार कब्जा

राज्य निमंत्रित महिला स्पर्धेचा रंगतदार समारोप

अश्विनी शिंदे आणि याशिका पुजारी ठरल्या स्पर्धेच्या नायिका

 

सोलापूर : हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने, सोलापूर जिल्हा कबड्डी व खो-खो असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थकोट प्रशाला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्य निमंत्रित महिला खो-खो व कबड्डी स्पर्धेचा रविवारी उत्साहपूर्ण समारोप झाला. खो-खोमध्ये धाराशिवच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने, तर कबड्डीत मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

 

अश्विनी-संध्याच्या अष्टपैलू खेळीने धाराशिवचा दणदणीत विजय

खो-खोच्या अंतिम सामन्यात छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, धाराशिव संघाने ठाण्याच्या ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशनचा १३-९ असा एक डाव राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. धाराशिवच्या विजयात अश्विनी शिंदे (३.३०, १.०० मिनिटे नाबाद संरक्षण व २ गुण) आणि संध्या सुरवसे (१.००, ३.०० मिनिटे संरक्षण व ३ गुण) यांनी अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत संघाला विजेतेपद मिळवून दिले. पराभूत ज्ञानविकासकडून दिव्या गायकवाड (१.४० मिनिटे संरक्षण व ३ गुण) हिने एकाकी झुंज दिली; मात्र संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही.

 


याशिका-प्रतिक्षा-सानियाची चमक; मुंबई उपनगरचा कबड्डी किताब

कबड्डीच्या अंतिम सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर संघाने बारामती अकॅडमीचा २९-१९ असा पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. विजेत्या संघाकडून याशिका पुजारी, प्रतिक्षा तांडेल आणि सानिया इंगळे यांनी अष्टपैलू खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखले. बारामतीच्या सुंदरी गुप्ता हिने झुंजार प्रयत्न केले, मात्र तिची लढत अपुरी ठरली.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५१ हजार, ₹३१ हजार आणि १५ हजार रोख पारितोषिकांसह अहिल्याबाई होळकर स्मृती करंडक प्रदान करण्यात आले.

 

यावेळी डॉ. सूर्यकांत कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, स्पर्धा निरीक्षक संदीप तावडे, जयंत मोरे, उमाकांत गायकवाड, श्रीरंग बनसोडे, शरद व्हनकडे, अजित शिंदे, मदन गायकवाड, एल. एस. गायकवाड, मरगु जाधव, संजय मोतेकर, लक्ष्मण बेल्हाळे, संतोष जाधव तसेच महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर, उपाध्यक्ष अक्षय वाकसे, नागेश खरात, सचिव शंकर नरोटे, सहसचिव समर्थ मोटे, खजिनदार प्रवीण खरात, जयदीप जानकर, शिवाजी वाघमोडे, सिद्धबाबा निशाणदार, दिग्विजय देवकते, प्रभात हक्के, अतुल माशाळ आणि योगेश तरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

स्पर्धेतील अव्वल संघ

खो-खो

१) छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (धाराशिव)
२) ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशन (ठाणे)
३) आर्यन स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी)

कबड्डी

१) स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर)
२) बारामती अकॅडमी (बारामती)
३) आनंदवन महिला संघ (परभणी)

वैयक्तिक पारितोषिक विजेते

खो-खो

  • अष्टपैलू खेळाडू : अश्विनी शिंदे (धाराशिव)
  • उत्कृष्ट आक्रमक : वैष्णवी फुटक (रत्नागिरी)
  • उत्कृष्ट संरक्षक : दिव्या गायकवाड (ठाणे)

कबड्डी

  • अष्टपैलू खेळाडू : याशिका पुजारी (मुंबई उपनगर)
  • उत्कृष्ट चढाईपटू : सुंदरी गुप्ता (बारामती)
  • उत्कृष्ट बचावपटू : प्रीती जाधव (सांगली)

Post a Comment

0 Comments