इनडोअर क्रिकेट स्पर्धा
टीपीएल-३ ची दणदणीत सुरुवात!
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वियोम फाउंडेशनची
विजयी सलामी;
अंधेरीतील चित्रकूट टर्फवर इनडोअर क्रिकेटचा
जल्लोष
चार टर्फवर एकाचवेळी सामने, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : अंधेरीतील चित्रकूट टर्फ शनिवारी इनडोअर क्रिकेटच्या रोमांचकारी लढतींनी
अक्षरशः दणाणून गेले. एमजीए फाउंडेशनने महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित 'टॅक्स सही है प्रीमियर लीग (टीपीएल) – सिझन ३' स्पर्धेला दमदार सुरुवात झाली. एकाच वेळी चार टर्फवर
सामने रंगल्याने क्रीडाप्रेमींना आनंद अनुभवायला मिळाला.
उद्घाटनाच्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि वियोम फाउंडेशन यांनी प्रतिस्पर्ध्यांवर प्रभावी विजय मिळवत
स्पर्धेत विजयी सलामी दिली.
रुपेश चुनेकरचा ऑलराऊंड करिष्मा; बीएमसीचा २ धावांनी थरारक विजय
उद्घाटनाच्या लढतीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने कॉर्पोरेट
कमांडर्सवर ६७-६५ अशी अवघ्या २ धावांनी मात करत
पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. या चुरशीच्या सामन्यात रुपेश चुनेकर यांनी १९ धावा करताना
गोलंदाजीत केवळ ४ धावा खर्च करून सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि सामनावीर
पुरस्कार पटकावला. प्रवीण रोटे यांनी ११ धावा, तर प्रशांत जाधव यांनी १२ धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
दुसरीकडे कॉर्पोरेट कमांडर्सकडून सलीम यांनी १३ धावा केल्या; मात्र रोहित आणि महेश यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
वियोम फाउंडेशनचा ९५ धावांनी विजयी धडाका; अश्विन-रोहितची घातक गोलंदाजी
दुसऱ्या साखळी सामन्यात वियोम फाउंडेशनने फाल्कन फाउंडर संघाचा १०७-१२ असा तब्बल ९५ धावांनी धुव्वा उडवत स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारलेल्या वियोम फाउंडेशनने प्रतिस्पर्ध्यांवर
सुरुवातीपासूनच जबरदस्त दबाव निर्माण केला. अश्विन डोंगरे आणि रोहित खरात यांच्या भेदक गोलंदाजीने फाल्कन फाउंडरचे फलंदाज
अक्षरशः हतबल झाले. दोघांनी मिळून ११ खेळाडूंना बाद करत प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या केवळ १२ वर रोखली.
इनडोअर क्रिकेटच्या नियमानुसार प्रत्येक बाद खेळाडूमागे ५ धावा वजा होत असल्याने फाल्कन फाउंडरची डावखोरी अधिकच
कोलमडली.
अश्विन डोंगरे आणि रोहित खरात ठरले विजयाचे
शिल्पकार
वियोम फाउंडेशनच्या विजयात अश्विन डोंगरे यांनी २१ धावा आणि ३ बळी, तर रोहित खरात यांनी १६ धावा आणि ५ बळी घेत अप्रतिम अष्टपैलू खेळ साकारला. प्रसाद यांनी १८ धावांचे मोलाचे योगदान
देत संघाचा विजय आणखी भक्कम केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत
वियोम फाउंडेशनने वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्यांना एकतर्फी पराभवाची चव चाखायला
लावली.
मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला अॅड. राजनारायण यादव, (उपाध्यक्ष, बीजेपी
उत्तर-पश्चिम जिल्हा मुंबई), मनीष अग्रवाल (सीए) – अध्यक्ष- एमजीए फाउंडेशन, बाळ
तोरसकर संस्थापक सेक्रेटरी – महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन, महिमा अग्रवाल
(सीए-मुंबई) - उपाध्यक्ष, एमजीए फाउंडेशन, धीरज ओसवाल (सीए-पुणे), दिनेश बचास
(सीए-दिल्ली), भार्गव दोशी (सीए-अहमदाबाद), कुसुम मिश्रा (सीए-कलकत्ता), जोतिका
राय (सीए-नागपूर), स्नेहा पाटील (सीए-मुंबई), पुरुषोत्तम यादव (उपाध्यक्ष,
समाजवादी पार्टी, उत्तर-पश्चिम जिल्हा, मुंबई), विनया तोरसकर (अध्यक्षा- वियोम फाउंडेशन),
अॅड. अवनीश तीर्थराज सिंग (अध्यक्ष- उत्तर भारतीय मोर्चा- कॉंग्रेस), दिव्या सिंग
(नगरसेविका – वॉर्ड ६१) यांच्या उपस्थितीत पार पडला. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या
उपस्थितीमुळे स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला विशेष दिमाख लाभला.
Post a Comment
0 Comments